चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 18:16 IST2025-09-17T18:13:34+5:302025-09-17T18:16:52+5:30
Manoj Jarange Patil Visit Delhi: मुंबईतील आंदोलन यशस्वी करून दाखवल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील मराठा समाजासाठी दिल्लीत धडकणार असल्याचे म्हटले जात आहे.

चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
Manoj Jarange Patil Visit Delhi: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील आत्ता दिल्लीला धडक देणार आहेत. विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी ऐन गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन केले. सरकारने मनोज जरांगे यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्यानंतर आनंद साजरा करत मराठा आंदोलक माघारी गेले. मनोज जरांगे यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली जात असतानाच मनोज जरांगे यांनी दिल्ली गाठणार असल्याची मोठी घोषणा केली.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. मराठ्यांचे वादळ आता दिल्लीत धडकणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी चलो दिल्लीचा नारा दिला आहे. देशभरातील मराठा समाजाचे ते दिल्लीमध्ये अधिवेशन घेणार आहेत. लवकरच अधिवेशनाची तारीख जाहीर होणार आहे, असे म्हटले जात आहे.
मराठा समाजाचे अधिवेशन घेणार
हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेटच्या अंमलबजावणी झाल्यानंतर दिल्लीमध्ये मराठा समाजाचे अधिवेशन होणार आहे. हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात झालेल्या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी ही घोषणा केली आहे. दिल्लीत आनंदोत्सव साजरा करायला जाणार. हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेटच्या अंमलबजावणी झाल्यानंतर आनंद सोहळा म्हणून दिल्लीला जाऊ. तिथे आरक्षण नाही, कोणतेही आंदोलन नाही, मागणी नाही. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी अटकेपार झेंडा लावला, ती ठिकाणे पाहायला जाणार, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत उपोषण सुरू केले होते. हजारो मराठा बांधव मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी मुंबईत आले. या आंदोलनाला यश आले. सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या मान्य केल्या, तर काही मागण्या पूर्ण होण्यासाठी वेळ मागितला आहे. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी ही मोठी घोषणा केली आहे.