ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा; भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2021 05:35 AM2021-01-26T05:35:01+5:302021-01-26T05:35:26+5:30

आता खा. प्रीतम मुंडे हा विषय सभागृहात मांडत आहेत. आता जनगणना होणार असून सकारात्मक पाऊले उचलत जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे.

Census of OBCs by caste; Demand of BJP leader Pankaja Munde | ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा; भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांची मागणी

ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा; भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांची मागणी

googlenewsNext

औरंगाबाद : राष्ट्रीय जनगणना होत असताना ओबीसी प्रवर्गाची जातीनिहाय जनगणना व्हावी, अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली. जातीनिहाय जनगणना झाल्यास चित्र स्पष्ट होऊन संबंधित समुदायाला न्याय देण्यासाठी मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.

एका खासगी कार्यक्रमासाठी पंकजा शहरात आल्या होत्या. सोबत खा. डॉ. प्रीतम मुंडे होत्या. जालना येथील ओबीसी मोर्चात सहभागी नसल्याबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या, उपस्थित नसले तरी त्या चळवळीचा गेल्या अनेक वर्षांपासून मी भाग आहे. ओबीसी समाजाची जनगणना व्हावी, ही मागणी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी संसदेत केली होती. आता खा. प्रीतम मुंडे हा विषय सभागृहात मांडत आहेत. आता जनगणना होणार असून सकारात्मक पाऊले उचलत जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे.

ओबीसी मोर्चात ‘आता मुख्यमंत्री ओबीसी’ असे बॅनर झळकले. ओबीसी म्हणून आपण या पदावर योग्य आहात, या पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना पंकजा म्हणाल्या, त्याला सहा वर्षे झाली आहेत. तो विषय मागे पडला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा मागील सरकारने व्यवस्थित हाताळला. सध्या समाजाची निराशा झाली असून ओबीसींच्या आरक्षणास धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी भूमिका आहे.

‘त्या’ प्रकरणाचे राजकीय भांडवल नाही
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपासंदर्भात विचारले असता पंकजा म्हणाल्या, तो विषय आता मागे पडला असून नैतिक, कायदेशीरदृष्ट्या त्या गोष्टींचे समर्थन मी करीत नाही. परंतु, हा विषय कुणाचाही असता तरी राजकीय भांडवल केले नसते आणि करणारही नाही. पण अशा प्रकारामुळे एखादे कुटुंब, त्या कुटुंबातील दोष नसलेल्यांना त्रास होतो. एक महिला म्हणून याकडे संवेदनशीलतेने पाहते, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Web Title: Census of OBCs by caste; Demand of BJP leader Pankaja Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.