नम्रता फडणीस, पुणे‘भवानी भवानी’ या गुजराथी चित्रपटापासून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या केतन मेहता यांनी ‘मिर्च मसाला’, ‘माया मेमसाब’ या अपारंपरिक चित्रपटांसह ‘रंग रसिया’, ‘मांझी : द माऊंट मँन’ यांसारख्या चित्रपटांच्या माध्यमातून भारतीय चित्रपटसृष्टीला साचेबद्ध चौकटीतून बाहेर काढत प्रेक्षकांना चित्रपटांकडे पाहण्याची वेगळी दृष्टी दिली. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि आशय फिल्म क्लबच्या वतीने ‘आझादी 70 साल : याद करो कुर्बानी’ या चित्रपट महोत्सवाचा समारोप मेहता यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सरदार’ चित्रपटाने झाला. त्या वेळी त्यांच्याशी साधलेला हा संवाद. सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर चित्रपट काढण्याची प्रेरणा कशी मिळाली? - देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधी, पंडित नेहरू, यांच्याबरोबरीने सरदार वल्लभभाई पटेल यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते, मात्र पटेल यांच्यावर अन्याय झाला आहे, त्यांचे कार्य म्हणावे तेवढे लोकांसमोर आलेले नसल्याने त्यांच्यावर चित्रपट निर्मित व्हावा आणि तो तुम्ही करावा अशी इच्छा गुजरातचे अर्थमंत्री हरिभाई पटेल यांनी व्यक्त केली होती आणि मी होकार दिला. तो अनुभव कसा होता? - हा चित्रपट करायला मिळतोय हीच आनंदाची गोष्ट होती. त्याकाळी गांधी, नेहरू आणि पटेल ही खूप प्रभावशाली व्यक्तिमत्त्वं होती. चित्रपटाच्या निमित्ताने स्वातंत्र्याच्या इतिहासाची पाळंमुळं अभ्यासली, विषयाच्या अधिक खोलात गेलो, तेव्हा जाणवले की छोट्या छोट्या परिस्थितीचा त्यांनी किती बारकाईने विचार केला. देशाच्या अखंडतेला बाधा आणणारी पाकिस्तानची फाळणी त्यांना का करावी लागली, त्यांनी शांततेतून कसा मार्ग काढला. खरेतर त्यांच्या कष्टातूनच देशात स्वातंत्र्याची पहाट उगवली. जगाच्या इतिहासात त्याची नोंद झाली, इतरांसाठी ही स्वातंत्र्यप्राप्ती एक ‘कॉरिडॉर’ ठरले. इतर देशांसाठी ती प्रेरणा देखील ठरली. एखाद्या विशिष्ट पक्षाचे सरकार सत्तेत आल्यानंतर स्वातंत्र्यलढ्यातील एकच चेहरा पुढे केला जातो? आणि त्याचे श्रेष्ठत्व दाखविण्याचा प्रयत्न केला जातो? यावर तुमचे मत काय?- तो राजकारणाचा एक भाग असू शकतो. त्याविषयी जास्त न बोललेच बरे. सेंन्सॉरशिपच्या कात्रीत हा चित्रपट अडकला होता का? चित्रपटांवर सेन्सॉरशिप लादणे योग्य आहे का? - खूप वर्षांपूर्वी हा चित्रपट केला असल्याने आता फारसे आठवत नाही. मूळात देशाच्या स्वातंत्र्यपूर्तीच्या इतक्या वर्षांनंतर ‘सेंन्सॉरशिप’ला काहीच अर्थ उरत नाही. त्या कलाकृतीवर विश्वास ठेवणे एवढाच नियम त्याला लागू होतो. तो चित्रपट चांगला किंवा वाईट हे प्रेक्षकच चांगल्या प्रकारे ठरवू शकतात. अभिव्यक्तीस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार आहे, त्यावर गदा आणता कामा नये. एनएफएआयच्या ‘नॅशनल हेरिटेज मिशनबद्दल’ तुम्हाला काय वाटते? - चित्रपटाचे जतन आणि संवर्धन होणे ही एक काळाची गरज बनली आहे. भारतात चित्रपट संस्कृतीचे उत्तम वातावरण आहे, त्या तुलनेत चित्रपट संवर्धनाबाबत आपल्याकडे पूर्णत: अभाव जाणवतो. केवळ या गोष्टीमुळे खूप चांगल्या चित्रपटांना आपण मुकलो आहोत. एनएफएआयने चित्रपट जतन आणि संवर्धनाचे जे आव्हान पेलले आहे त्यामुळे चित्रपट संस्कृतीला एक प्रकारे चालना मिळणार आहे. आगामी चित्रपटाबद्दल काय सांगाल? - ‘मंगल पांडे द रायझिंग’, या चित्रपटानंतर ‘राणी आॅफ झॉंसी’ आणि शेवटच्या मुघल साम्राजाचा दावेदार बहाद्दूर शहा जफर’ अशा दोन ऐतिहासिक चित्रपटांची मालिका सादर करणार आहे. जागतिक इतिहासात झाशीची राणी ही खूपच कणखर स्त्री होती. कंगना राणावत या क्वीनसाठीदेखील परफेक्ट वाटल्याने ती या भूमिकेत दिसणार आहे.
‘सेन्सॉरशिप’ला काहीच अर्थ उरत नाही
By admin | Updated: August 17, 2016 01:13 IST