सातारा : राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे हे सध्या आपल्या साताऱ्यातील मूळ गावी आले आहेत. सत्ता स्थापनेच्या धावपळीतच ते गावी आल्याने अनेक चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आता गावी आल्यानंतर शिंदेंची तब्येत बिघडल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या दरे येथील बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल झाली आहे. त्यांच्या शरीराचे तापमान हे १०४° असून नुकतेच त्यांना सलाईन लावल्याचे सूत्रांकडून समजत आहे.प्रकृतीच्या कारणास्तव शिंदे आज बाहेर पडले नाहीत. त्यांनी घरीच आराम करणे पसंत केले. ऐन राजकीय घडामोडींच्या काळातच शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता मुख्यमंत्रीपदाचा मान कोणाला मिळणार यावरून स्पर्धा सुरू आहे. मुख्यमंत्रीपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. ऐन शपथविधी सोहळ्याची वेळ जवळ येते तेच नाराज एकनाथ शिंदेंनी थेट गाव गाठलं आहे.दीपक केसरकर माघारी गेले..शिंदे गटाचे नेते माजी मंत्री दीपक केसरकर हे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला त्यांच्या दरे या गावी आले होते. मात्र एकनाथ शिंदे यांची तब्येत ठीक नसल्याने केसरकर यांना बंगल्याच्या गेटवरूनच माघारी परतावे लागले. दरम्यान केसरकर मुंबईला रवाना झाले.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल
By दीपक शिंदे | Updated: November 30, 2024 16:40 IST