कार मुंबईची, चढणार रायगडमध्ये, उतरणार गोव्यात; कोकणवासीयांना ठेंगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 08:42 IST2025-07-26T08:42:38+5:302025-07-26T08:42:53+5:30
रोरोचा फायदा नाही; कोकण रेल्वेचा नाकापेक्षा मोती जड

कार मुंबईची, चढणार रायगडमध्ये, उतरणार गोव्यात; कोकणवासीयांना ठेंगा
मुंबई : कोकण रेल्वेने गणपतीसाठी कोलाड ते वेरना या स्थानकांदरम्यान रोरो सेवा जाहीर केली आहे. या सेवेसाठी मुंबईतून वाहनाने कोलाडला जावे लागेल आाणि तेथून गाडी थेट गोव्याला उतरावी लागेल. ही सेवा मधील कोणत्याही स्थानकावर मिळणार नाही. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना या सेवेचा कोणताही फायदा नसल्याचे स्पष्ट झाले. या सेवेऐवजी अतिरिक्त एक्स्प्रेस चालवाव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
कोकण रेल्वेच्या रो-रो सेवेत गाडी ट्रेनमध्ये लोड करण्यासाठी मुंबईमधून १०० किमी अंतर पार करत तीन तास आधी कोलाड स्टेशनवर पोहोचावे लागणार आहे, तर वेरनामध्ये उतरवण्यासाठी आणि तिथून कोकणात जाण्यासाठी कोकणवासीयांचा साधारण १० तास वेळ वाया जाणार आहे. त्यामुळे या सेवेमुळे वेळेत कसे पोहोचता येणार असा प्रश्न विचारला जात आहे. ही ट्रेन १२ तासांमध्ये गोव्यात पोहोचणार आहे.
भाडे परवडणारे नाहीच
कुटुंबातील पाच सदस्यांचा कोकणापर्यंतचा कार प्रवास पाच ते सहा हजारांत होऊ शकतो. मात्र रो-रो सेवेचे भाडे ७,८७५ (जीएसटीसह) आकारले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कारसोबत जाणाऱ्यांनाही अतिरिक्त तिकीट काढून जावे लागणार आहे. त्यामुळे नाकापेक्षा मोती जड म्हणण्याची वेळ चाकरमान्यांवर आली आहे.
...त्यापेक्षा एक्स्प्रेस वाढवा
एका ट्रेनमधून ४० वाहने आणि १२० प्रवाशांचीच वाहतूक होणार आहे. २३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरदरम्यान एक दिवस आड करून दहा दिवस ही सेवा चालविण्यात येणार आहे. म्हणजे ट्रेन फुल्ल झाली तरी या कालावधीत एकूण १२०० प्रवासीच त्यातून प्रवास करू शकतील. त्याऐवजी जर एक्स्प्रेस चालवली तर याच कालावधीत सुमारे ३२ हजार प्रवासी प्रवास करू शकले असते, असे अखंड कोकण रेल्वे प्रवासी समितीचे सचिव अक्षय महापदी यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही सेवा नसून एक फसवा प्रयोग असल्याची टीका करण्यात येत आहे.