परीक्षा रद्द करा; विद्यार्थी, पालकांकडून लाखाे ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 01:41 IST2021-04-07T01:41:16+5:302021-04-07T01:41:30+5:30

ट्विटरवर ‘कॅन्सल बोर्ड एक्झाम’ मोहीम ट्रेंड

Cancel the exam; Millions of tweets from students, parents | परीक्षा रद्द करा; विद्यार्थी, पालकांकडून लाखाे ट्विट

परीक्षा रद्द करा; विद्यार्थी, पालकांकडून लाखाे ट्विट

मुंबई : एकीकडे दहावी, बारावीच्या ऑफलाइन परीक्षा आणि त्यांचे नियोजन यासंदर्भात शिक्षण विभाग बैठका घेत असताना दुसरीकडे विद्यार्थी, पालकांनी परीक्षा रद्द व्हाव्यात यासाठी आता सोशल मीडियाचे शस्त्र हाती घेतले आहे. ६ एप्रिल म्हणजे मंगळवारी विद्यार्थी, पालकांनी ट्विटरवर #cancelboardexams2021 या नावाखाली संध्याकाळपर्यंत तब्बल ४ लाख १९ हजार ट्विट्स करून घेण्यात येणाऱ्या परीक्षांचा निषेध नोंदविला. 
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऑफलाइन परीक्षा घेऊन ३० लाख विद्यार्थ्यांची, त्यांच्या कुटुंबीयांची शिवाय पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सुरक्षितता व आरोग्य धोक्यात घालू नये, असाच या ट्विटर ट्रेंडिंगचा सूर होता.

ऑनलाइन अभ्यासामुळे विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव सुटला आहे. अनेक कन्सेप्ट क्लिअर झालेल्या नाहीत. २५ टक्के अभ्यासक्रमात कपात केली असूनही अनेक विषयांचा अभ्यास पूर्ण झाला नाही, अशा तक्रारी विद्यार्थ्यांनी ट्विटद्वारे केल्या. 

 कोरोनाकाळात मोठ्यांप्रमाणेच विद्यार्थ्यांना मानसिक ताण आला आहे. शाळा, महाविद्यालयांत जाऊन ३ तास संसर्गाच्या छायेत परीक्षा देणे  जोखमीचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा  अडचणीत येईल शिवाय कुटुंबीयांना संसर्गाची भीती असल्याचे मत पालकांनी मांडले. शिक्षणमंत्री, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री आणि पंतप्रधान यांनाही पालकांनी या ट्विटर ट्रेंडिंग मोहिमेत टॅग केले आहे.

दिवसाला ९ ते ११ हजार रुग्णसंख्या असताना ऑफलाइन परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार असून दहावी, बारावी परीक्षांसाठी इतर पद्धती अवलंबल्या जाव्यात हीच पालक, विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे. महाराष्ट्रात परिस्थिती गंभीर असताना, सर्व आस्थापना, गोष्टी बंद केल्या जात असताना परीक्षांचा अट्टाहास का? विद्यार्थी, पालकांचा आवाज आंदोलने, निषेध, मोर्चे यांतून सरकारपर्यंत पोहोचत नसल्याने आता त्यांनी हा मार्ग अवलंबला आहे.
- अनुभा सहाय, अध्यक्षा, इंडिया वाईड पॅरेण्ट असोसिएशन

Web Title: Cancel the exam; Millions of tweets from students, parents