मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचू लागला असून, आता वादग्रस्त विधान अन् वार-पलटवारांनी राजकीय मैदान गाजू लागले आहे. नगरांच्या निवडणुकीत वादाचे नगारे वाजत आहेत. आम्ही श्रीरामाचे अनुयायी, लंका आम्हीच जाळणार असा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंच्या टीकेवर केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आक्षेपार्ह शब्दाबद्दल दिलगिरी व्यक्त करावी लागली. शिंदेसेनेचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी १ तारखेला बाहेर खाटेवर झोपा, लक्ष्मीदर्शन घडेल, असे वक्तव्य करून वादाला तोंड फोडले आहे.
पालघर जिल्ह्यातील डहाणू नगर परिषद निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदेसेनेत थेट सामना होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर अहंकारामुळे रावणाची लंका जळाली होती, अशी टीका केली होती. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी जोरदार प्रत्युत्तर दिले.. अकोला जिल्ह्यातील अकोट येथे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, एखादा शब्द चुकीचा माझ्याकडून जातो, तो जाऊ नये. मी परवा अंबाजोगाई येथे चुकीचा शब्द वापरला. तो शब्द मला वापरायला नको होता. पवार यांनी अंबाजोगाईत ‘बकाल... भिकार**’ असे शब्द वापरले होते.
वार : अहंकारामुळे रावणाची लंका जळून खाक
डहाणूमध्ये आपण सर्वजण एकाधिकारशाही, अहंकाराविरोधात एकत्र आलेला आहात. अहंकार तर रावणामध्येही होता. अहंकारामुळे रावणाची लंका जळून खाक झाली. गर्व, घमंड आणि अहंकार यामुळे सोन्याची लंका जळून जाते. तुम्हाला दोन तारखेला तेच करायचे आहे.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
पलटवार : भाजपचा 'भरत'च लंका पेटविणार
कोणी म्हणाले असेल की, तुमची लंका जाळून टाकतो. आपण लंकेत राहत नाही. आपण रामाचे अनुयायी आहोत. रामाच्या भावाची लंका असू शकते का? अशा गोष्टी निवडणुकीत बोलाव्या लागतात. भाजप हा प्रभू श्रीरामांना मानणारा पक्ष असून पक्षाचा उमेदवार भरत हाच लंका पेटवेल. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
गुलाबराव पाटील : १ तारखेला लक्ष्मी येणार आहे
आपल्याकडे नगरविकास खातं, त्यात माल आहे. मागच्यावेळी आमदारकीचे २१ तारखेला मतदान होते. १८ तारखेला लक्ष्मी फिरली, दारोदार फिरली. ऊठ भक्ता काय झोपलाय, मी आलीये तुला प्रसन्न करायला. तुम्ही बाहेर खाटी टाकून झोपा. १ तारखेला लक्ष्मी येणार आहे. ऊठ भक्ता काय झोपलाय ऊठ. माझ्या तीन दशकांच्या आमदारकीत अनेक मुख्यमंत्री बघितले. रात्री दोनपर्यंत जागून लोकोपयोगी कामे आणि जीआर काढणारा एकमेव मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदेच होते.
बावनकुळे : निवडणुकीत असे बोलावे लागते निवडणुकीमध्ये असे बोलावे लागते. मात्र, निधी किती द्यायचा आहे, हे आमचे तिन्ही प्रमुख नेते मिळून ठरवतात. निवडणुकीमध्ये अशी भाषणे केली जातात.