भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या विधानानं शिंदे गटातील खासदाराची धाकधूक वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 04:47 PM2022-08-21T16:47:46+5:302022-08-21T16:59:49+5:30

बावनकुळेंचे हे विधान सध्याचे बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्यासाठी धोक्याची घंटा मानलं जात आहे

Buldani's next MP will be from BJP, state president Chandrashekhar Bawankule's statement, Shinde MP Prataprao Jadhav's tension increased | भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या विधानानं शिंदे गटातील खासदाराची धाकधूक वाढली

भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या विधानानं शिंदे गटातील खासदाराची धाकधूक वाढली

googlenewsNext

बुलढाणा - राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता भारतीय जनता पार्टीने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. भाजपा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे सध्या पक्षसंघटना वाढीवर भर देत आहेत. बावनकुळे नुकतेच बुलढाणा जिल्ह्यात आले होते. त्याठिकाणी त्यांनी शहर भाजपा जिल्हा कार्यकारणीची बैठक घेतली. या बैठकीत बावनकुळेंनी केलेल्या एका विधानानं शिंदे गटातील खासदाराची धाकधूक वाढली. 

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारताचा विश्वगुरु बनण्याचा प्रवास सुरू आहे. मोदींचे व्हिजन भारताला जागतिक उंचीवर नेणार आहे. नरेंद्र मोदींचे हात मजबूत करण्यासाठी २०२४ च्या निवडणुकीत बुलढाण्याचा खासदार भाजपाच्या कमळ चिन्हावरचा द्यावा लागेल असं त्यांनी म्हटलं. 

बावनकुळेंचे हे विधान सध्याचे बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्यासाठी धोक्याची घंटा मानलं जात आहे. प्रतापराव जाधव यांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारलं असून २०२४ मध्ये आपणच शिवसेना-भाजपाचे उमेदवार राहू अशी आशा धरली आहे. परंतु चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानानं जाधवांच्या आशेवर पाणी फिरलं असून उमेदवारी मिळणार की नाही यामुळे धाकधूक वाढली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे आहेत. त्यामुळे त्यांनी मिशन भाजपा हाती घेतले आहे.

त्यात बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव हे सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. याठिकाणी भाजपाचे ३ आणि शिंदे गटाचे २ आमदार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीचा १-१ आमदार आहेत. पुढील निवडणुकीत भाजपा-शिंदे गटाने एकत्रित निवडणूक लढवल्यास येथे युतीचं वर्चस्व असल्याचं सिद्ध होत आहे. मात्र बावनकुळे यांनी पुढील लोकसभा खासदार भाजपाच्या कमळ चिन्हावरील असेल असं सांगितल्याने शिंदे गट आणि भाजपात पेच वाढण्याची शक्यता आहे. 

एकनाथ शिंदेंचं बंड आणि सुप्रीम कोर्टाची लढाई
शिंदे यांच्यासह विधानसभेतील ४० आणि लोकसभेतील १२ खासदारांनी शिवसेना नेतृत्वाविरोधात बंड पुकारलं आहे. शिंदे यांनी भाजपासोबत हात मिळवणी करत खरी शिवसेना आम्हीच आहोत असा दावा केला आहे. त्याबाबत सुप्रीम कोर्टासह केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रश्न प्रलंबित आहे. दोन्ही गटाने निवडणूक आयोगाकडे कागदपत्रे सादर केली आहेत. बहुमताच्या आधारे आम्हालाच धनुष्यबाण चिन्ह द्यावं असा दावा शिंदे गटाने केला आहे. परंतु सुप्रीम कोर्टात न्याय प्रविष्ट बाब असल्याने खरी शिवसेना कुणाची हा प्रश्न अद्यापतरी अनुत्तरीत आहे. 

Web Title: Buldani's next MP will be from BJP, state president Chandrashekhar Bawankule's statement, Shinde MP Prataprao Jadhav's tension increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.