सेनेच्या मेट्रोविरोधामागे ‘बिल्डरप्रेम’
By Admin | Updated: June 10, 2016 08:04 IST2016-06-10T05:12:40+5:302016-06-10T08:04:11+5:30
कुलाबा-वांद्रे-सीप्झ दरम्यानच्या मेट्रो-३ प्रकल्पाला शिवसेनेने केलेला विरोध हा केवळ बिल्डरांचे हित जपण्यासाठी आहे.

सेनेच्या मेट्रोविरोधामागे ‘बिल्डरप्रेम’
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ दरम्यानच्या मेट्रो-३ प्रकल्पाला शिवसेनेने केलेला विरोध हा केवळ बिल्डरांचे हित जपण्यासाठी आहे. समूह विकासाच्या माध्यमातून मेट्रोमुळे बाधित होणाऱ्या रहिवाशांना दुप्पट क्षेत्रफळाचे घर देण्याची सरकारची भूमिका आहे. सरकारच्या या भूमिकेमुळे आधीच पुर्नविकासाचे करार केलेल्या बिल्डरांचे धाबे दणाणले आहेत. या बिल्डरांचे हित जपण्यासाठीच शिवसेनेने मेट्रो-३ला विरोध करण्याची भूमिका घेतली आहे, अशी टीका भाजपाने केली.
मुंबई भाजपाध्यक्ष आशीष शेलार यांनी गुरुवारी प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. मेट्रो रेल कार्पोरेशनला महापालिकेचे १७ भूखंड देण्यास शिवसेनेने विरोध केला आहे. मुळात मेट्रोने हे भूखंड लीजवर मागितले आहेत. भूखंडांची मालकी महापालिकेकडेच राहणार असून त्यासाठीच्या तब्बल ३७ अटीही कार्पोरेशनने मान्य केल्या आहेत. मेट्रोने मालकीचा आग्रह धरलेला नाही, असे शेलार यांनी स्पष्ट केले.
मेट्रोमुळे कुलाबा, गिरगाव भागातील मराठी माणूस विस्थापित होणार असल्याची शिवसेनेची ओरड चुकीची आहे. मेट्रोमुळे कोणीच विस्थापित होणार नाही. प्रकल्पबाधितांना त्याच ठिकाणी घरे देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. उलट प्रकल्पबाधितांना दुप्पट आकाराचे घर मिळणार आहे. त्याबाबतचा आराखडाही राज्य सरकारने मागील महिन्यात महापालिकेकडे पाठविला आहे. मात्र, पुर्नवसनाच्या राज्य सरकारच्या योजनेमुळे खासगी बिल्डरांची अडचण झाली आहे, असे मत आरोप शेलार यांनी मांडले. (प्रतिनिधी)
>महत्त्वाची ठिकाणे जोडली जाणार
मेट्रो-३ मुळे मुंबादेवीपासून हाजीअली, सिद्धीविनायक ते अंधेरी दरम्यानची सर्व धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत. जे. जे., पोदार, एशियन, गुरुनानक, होली फॅमिली ते सेव्हन हिल अशी सर्व रुग्णालये एका मार्गावर येणार आहेत. शिवाय, मुंबई विद्यापीठ, कलिना कॅम्पस्, जे. जे. स्कूल आॅफ आर्ट, कीर्ती कॉलेज, सेंट झेव्हियर्स ते अंधेरीपर्यंतची सर्व महाविद्यालये जोडली जाणार आहे. धार्मिक स्थळे, शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयांना जोडणा-या या मेट्रो-३ मागील विरोधाचे राजकारण थांबवावे, असे आवाहनही शेलार यांनी केले.