भावाची तफावत : पणन महासंघाच्या बंडीत टाकले नाही एकही बोंड
By Admin | Updated: November 17, 2016 20:24 IST2016-11-17T20:24:24+5:302016-11-17T20:24:24+5:30
यावर्षीच्या कापूस हंगामात पणन महासंघाकडून १५ नोव्हेंबरपासून कापूस खरेदीचा शुभारंभ झाला. मात्र तीन दिवस उलटूनही शासकीय कापूस खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे.

भावाची तफावत : पणन महासंघाच्या बंडीत टाकले नाही एकही बोंड
शासकीय कापूस खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ
खामगाव, (जि.बुलडाणा) : यावर्षीच्या कापूस हंगामात पणन महासंघाकडून १५ नोव्हेंबरपासून कापूस खरेदीचा शुभारंभ झाला. मात्र तीन दिवस उलटूनही शासकीय कापूस खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. कापसाच्या भावात तफावत असल्याने पणन महासंघाची आतापर्यंत कापूस खरेदी झालीच नाही.
राज्यात महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्यावतीने कापूस खरेदी करण्यात येते. पुर्वी दिवाळीच्या अगोदरच हमीभावाने कापूस खरेदी केंद्र सुरू होत असून यावर्षी ४ हजार १६० रूपये हमीभावाने कापूस खरेदी पणन महासंघाकडून ठरविली आहे. जळगाव जामोद, शेगाव व देऊळगाव राजा येथे पणन महासंघाची कापूस खरेदी केंद्र आहेत. यावर्षी १५ नोव्हेंबरला जिल्ह्यात केवळ जळगाव जामोद केंद्रावर कापूस खरेदीचा शुभारंभ झाला. पणन महासंघाच्या अधिकाऱ्यांनी काटापूजन केले. मात्र येथे कापूस खरेदीसाठी आला नाही. तीन दिवसाचा कालावधी उलटूनही एकही बोंडाची कापूस खरेदी झाली नाही. शेतकऱ्यांनी पणन महासंघाच्या केंद्राकडे पाठ फिरविली आहे. खाजगी व्यापाऱ्यांनी ४७०० ते ४८०० रूपये प्रति क्विंटल दराने कापूस खरेदी सुरू आहे. पणन महासंघापेक्षा जादाचा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी व्यापाऱ्यांना पसंती दिली आहे. (शहर प्रतिनिधी)
गतवर्षी ७ हजार क्विंटल कापूस खरेदी
पणन महासंघाच्यावतीने गतवर्षी जळगाव जामोद, शेगाव व देऊळगाव राजा या तीन केंद्रावर कापूस खरेदी करण्यात आली होती. गतवर्षी कापसाला ४ हजार १०० रूपये प्रति क्विंटल भाव होता. तीनही केंद्रावर ७ हजार १०० क्विंटल कापूस खरेदी केली होती. यावर्षी शासनाने केवळ ६० रूपये कापसाची भाववाढ करून ४१६० रूपये प्रति क्विंटल हमीदर ठरविला आहे.