परळमध्ये गवसला ब्रिटिशकालीन दगड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2017 03:29 IST2017-04-08T03:29:56+5:302017-04-08T03:29:56+5:30
पदपथ व रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्याची जोरदार मोहीम महापालिकेने हाती घेतली

परळमध्ये गवसला ब्रिटिशकालीन दगड
मुंबई : पदपथ व रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्याची जोरदार मोहीम महापालिकेने हाती घेतली असून, या कारवाईत पालिकेच्या कर्मचाऱ्यांना मैलाचा दगड गवसला आहे. परळ येथील केईएम रुग्णालयामागे एस.एस. राव मार्गावरील पदपथांवर कारवाईदरम्यान ब्रिटिश काळातील या दगडाचा शुक्रवारी सकाळी शोध लागला आहे.
बेकायदा बांधकामाला अभय दिल्याप्रकरणी एन विभागाच्या सहायक आयुक्तांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे सर्व सहायक आयुक्तांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे मुंबईत सर्वत्र रस्त्यावरील अतिक्रमण, फेरीवाले, बेकायदा बांधकामांविरोधात जोरदार कारवाई सुरू आहे. अशीच कारवाई शुक्रवारी सकाळी परळ विभागात सुरू असताना पालिकेच्या कामगारांना मैलाचा दगड सापडला. त्यांनी तत्काळ अधिकाऱ्यांना सूचित केले. या दगडावर रोमन अंकात पाच लिहिण्यात आले आहे. तसेच ‘माइल्स’ असे लिहिले आहे. दोन ठिकाणांमधील अंतर दर्शविण्यासाठी रस्त्याच्या कडेला बसविलेल्या दगडाला ‘मैलाचा दगड’ असे म्हणतात. ब्रिटिश काळात असे दहाहून अधिक मैलाचे दगड कुलाबा ते दादर या शहरी भागात बसविण्यात आले होते. (प्रतिनिधी)
ब्रिटिश काळातील हे दगड कालांतराने जमिनीखाली गाडले गेले. अतिक्रमणावर कारवाई सुरू असताना अनेकवेळा अशा दगडांचा शोध लागला आहे. असे सात ते आठ दगड असतील ज्यावर आता अतिक्रमणे उभी राहिली आहेत.