Breaking : ‘स्वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकर यांच्यावर जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 07:47 PM2020-12-09T19:47:05+5:302020-12-09T20:05:09+5:30

चिखली रोडवरील कार्यालयासमोर एकाने कुऱ्हाडीच्या सहाय्याने जीवघेणा हल्ला केला.

Breaking: Attack on 'Swabhimani' leader Ravikant Tupkar | Breaking : ‘स्वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकर यांच्यावर जीवघेणा हल्ला

Breaking : ‘स्वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकर यांच्यावर जीवघेणा हल्ला

googlenewsNext
ठळक मुद्देही घटना नऊ डिसेंबरला सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. जनार्धन दगडू गाडेकर यांनी कुऱ्हाडीने वार करण्याचा प्रयत्न केला.

बुलडाणा: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यावर नऊ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास त्यांच्या चिखली रोडवरील कार्यालयासमोर एकाने कुऱ्हाडीच्या सहाय्याने जीवघेणा हल्ला केला. दरम्यान या घटनेत ते थोडक्यात बचावले असून त्यांचा स्वीय सहाय्यक जखमी झाला आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.या प्रकरणी पोलिसांनी हल्ला करणाऱ्या जनार्धन दगडू गाडेकर (रा. सावळा) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून कुऱ्हाडीसह अन्य एक हत्यारही जप्त केले आहे. ही घटना नऊ डिसेंबरला सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली.

रविकांत तुपकर हे बुधवारी तीन तालुक्यांचा दौरा करून सायंकाळी बुलडाण्यात परत आले असता त्यांच्या चिखली रोडवरील कार्यालयात बसलेले होते. त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्यांना सोडण्यासाठी ते बाहेर आले असता एक व्यक्ती त्यांच्या वाहनाचा नंबर नोंद करून घेत होता. यावेळी रविकांत तुपकर यांच्या स्वीय सहाय्यक सौरभ पडघान यांनी संबंधिताला हटकले असता रविकांत तुपकर यांच्यावर जनार्धन दगडू गाडेकर यांनी कुऱ्हाडीने वार करण्याचा प्रयत्न केला. हा वार त्यांचे अंगरक्षक गणेश चाटे यांनी रोखला. मात्र दुसरा वार गाडेकर यांनी केला असता कुऱ्हाड उलट्या बाजूने सौरभ पडघान यांच्या छातीत लागल्याने ते जखमी झाले. त्यानंतर तेथे गोंधळ झाला. या घटनेत सुदैवाने रविकांत तुपकर थोडक्यात बचावले. सौरभ पडघा यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

दरम्यान या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिसांनी आरोपी जनार्धन दगडू गाडेकर यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडील कुऱ्हाड व अन्य हत्यारही ताब्यात घेतले आहे. वृत्त लिहीपर्यंत यासंदर्भात बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. जीवे मारण्याचा प्रयत्न तथा अंगरक्षक असलेल्या पोलिसाला त्याच्या कर्तव्यापासून रोखल्या प्रकरणी शासकीय कामात अडथळा यासह अन्य कलमान्वये या प्रकरणात गुन्हे दाखल होण्याची शक्यता पोलिस सुत्रांनी व्यक्त केली. दरम्यान, या घटनेची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना कळताच पोलिस ठाण्यात मोठ्या संख्येने स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

Web Title: Breaking: Attack on 'Swabhimani' leader Ravikant Tupkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.