Breaking: ओसरगाव येथील जळालेल्या महिलेचा छडा लागला; कर्जातून बाहेर पडण्यासाठी अंगणवाडीसेविकेची हत्या
By अनंत खं.जाधव | Updated: February 28, 2025 09:14 IST2025-02-28T09:13:47+5:302025-02-28T09:14:41+5:30
आरोपी वेगुर्लेचा, बेळगाव मार्गावरून ताब्यात

Breaking: ओसरगाव येथील जळालेल्या महिलेचा छडा लागला; कर्जातून बाहेर पडण्यासाठी अंगणवाडीसेविकेची हत्या
सावंतवाडी : ओसरगाव येथे महामार्गालगत जळालेल्या स्थितीत आढळलेला ‘तो’ मृतदेह सावंतवाडी तालुक्यातील किनळे येथील अंगणवाडीसेविका सुचिता सोपटे हिचाच असून तिची हत्या करण्यात आल्याचे आता निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने आंबोली बेळगाव मार्गावरून गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले असून तो वेंगुर्ले तालुक्यातील असल्याचे पुढे आले आहे. कर्ज बाजरी असल्यानेच त्याने या महिलेचा गोड बोलून काटा काढला असून पहिल्यांदा गाडीतील टाॅमीने डोक्यावर घाव घालून मारले आणि तिला ओसरगाव येथे पेट्रोल ओतून जाळण्यात आल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे.
महामार्गावरील ओसरगाव येथे २५ फेब्रुवारीला मध्यरात्री सव्वाबारा वाजता एका महिलेचा जळत असलेला मृतदेह स्थानिकांना दिसून आला होता. मृतदेहाचा गुडघ्यापासूनचा एक पाय आणि एका हाताचा पंजा शिल्लक राहिला होता. ही बेपत्ता महिला कोण याचाच शोध पोलिस घेत असतानाच सावंतवाडी तालुक्यातील किनळे येथील अंगणवाडी सेविका सुचिता सोपटे ही बेपत्ता असल्याचे पुढे आले होते. पोलिसांकडून त्या दृष्टीने तपास सुरू केला आणि एक एक धागा हा सुटत गेला.
ही महिला 23 फेब्रुवारीपासून घरातून कोल्हापूर येथे डाॅक्टरकडे जाते म्हणून निघून गेली होती. त्यानंतर तिचा मोबाईल लागत नव्हता. घरातील दागिने ही घेऊन गेली होती. त्यामुळे घरच्यांनी पोलिसात बेपत्ताची तक्रार दिली होती. पोलिसांनी बेपत्ता तक्रारी वरून महिलेचे शेवटचे लोकेशन कुठे दिसते तसेच महिला कुठून कुठे गेली याचाच तपास सुरू केल्यानंतर ओसरगाव येथील घटनेतील महिला ही किनळे येथील असल्याचे पुढे आले. महिलेची मुलगी मुंबईवरून गुरूवारी कणकवली येथे दाखल झाली. तिने ही दागिन्यावरून आईचाच मृतदेह असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर पोलिसांनी यातील संशयित आरोपी वर लक्ष केंद्रित केले तेव्हा वेंगुर्ले येथील एका व्यक्तीचा या महिलेशी सतत संपर्क दिसून येत होता.
त्यावरून पोलिसांनी गुरूवारी रात्रीच या संशयित आरोपीला बेळगावच्या दिशेने जात असतनाच ताब्यात घेतले. त्याने आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यावरून ही महिला किनळे येथील अंगणवाडीसेविका असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच या गुन्ह्य़ातील आरोपीला अटक करण्यात पोलिसाना यश आले असून ही हत्या आरोपीने कर्जबाजारीपणातून केली असून या महिलेचे दागिने विकण्यासाठी तो बेळगाव येथे जात असतनाच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी अवघ्या काही तासात प्रकरणाचा छडा लावल्याने पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.