मुंबई : एसटी महामंडळातील कमी पगार, अनियमिततेला कंटाळून जळगाव आगारात वाहक म्हणून नोकरीला असलेल्या मनोज अनिल चौधरी (३०, रा.कुसुंबा, ता.जळगाव) या कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी ८.३० वाजता उघडकीस आली. यानंतर टीकेचे धनी झालेल्या ठाकरे सरकराने लगेचच एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस आणि एका महिन्याचा पगार देण्यात येणार असल्याची घोषणा केली.
आत्महत्या करण्यापूर्वी मनोजने चिठ्ठी लिहिली असून त्यात एसटी महामंडळातील कार्यपद्धती व आपले मराठी माणसांचे ठाकरे सरकार (शिवसेना) हेच माझ्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा उल्लेख केला होता. एसटी महामंडळातील कमी पगार व त्यातील अनियमितता यास कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. यास जबाबदार एसटी महामंडळातील कार्यपद्धती व आपले मराठी माणसांचे ठाकरे सरकार आहे. (शिवसेना) माझ्या घरच्यांचा यात काहीही संबंध नाही. संघटनांनी माझा पी.एफ.व एलआसी माझ्या परिवाराला मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. ही विनंती, असे त्यांनी चिठ्ठीत म्हटले होते.
एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या तीन महिन्यांचा पगार थकलेला आहे. त्यापैकी दोन महिन्यांचा पगार देण्यात येणार आहे. या महिन्याचा पगार तासाभरात केला जाईल अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. दिवाळीपूर्वी आणखी एका महिन्याचा पगार कर्मचाऱ्यांना दिला जाईल. दिवाळी बोनसही दिला जाईल. एसटी कर्मचाऱ्यांनी हे तात्पुरते संकट आहे, टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन परब यांनी केले आहे. तसेच एसटीच्या ज्या दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे त्यांच्याशी संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. आज एका तासात महिन्याचा पगार आणि सणाची अग्रणी रक्कम वळती केली जाईल, असेही परब यांनी सांगितले.