Bogus Voter: 'त्या' घरात ८०० नव्हे, पाचच सदस्यांचे वास्तव्य; जयंत पाटील यांच्या आरोपात किती सत्यता? काय आढळलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 18:57 IST2025-10-16T18:56:27+5:302025-10-16T18:57:50+5:30
Bogus Voters Maharasthra News: महाविकास आघाडीने बुधवारी एक पत्रकार परिषद घेतली. त्यात जयंत पाटील यांनी नाशिकमधील बोगस मतदारांचा मुद्दा उपस्थित केला.

Bogus Voter: 'त्या' घरात ८०० नव्हे, पाचच सदस्यांचे वास्तव्य; जयंत पाटील यांच्या आरोपात किती सत्यता? काय आढळलं?
Nashik Latest News: मुंबईत झालेल्या इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत मध्य नाशिकमधील एका घरात तब्बल ८०० पेक्षा जास्त मतदार असल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर त्या घराचा शोध घेण्यासाठी प्रशासनासह राजकीय पदाधिकाऱ्यांची धावपळ उडाली. ज्या घरात जास्त मतदार असल्याचा आरोप करण्यात आला, त्या घराचे नूतनीकरण करण्यात आले असून, त्या इमारतीत आता कोणीच वास्तव्यास नसल्याचे दिसून आल्याने या आरोपाबाबतचे गूढ अजूनच वाढले आहे.
मुंबईत आघाडीच्या वतीने बुधवारी (१५ ऑक्टोबर) घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी आरोप करताना जुने नाशिकमधील घर नंबर ३८२८/२९ मध्ये तब्बल ८०० पेक्षा जास्त मतदार असल्याचा आरोप केला.
जिल्हा प्रशासनाने घेतला शोध, सत्य आले समोर
त्यानंतर जिल्हा प्रशासनाची धावपळ उडाली. निवडणूक विभागाच्या वतीने निवडणुकीच्या संकेतस्थळावर त्याची शोधमोहीम सुरू करण्यात आली. ऑनलाइन शोध घेताना एकाच घर नंबरवर इतके मतदार दिसून आले नसल्याचे निवडणूक विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
परंतु तरीही मध्य नाशिकचा निवडणूक विभाग आणि बुथ लेव्हल ऑफिसर यांना यासंदर्भात सूचना देत या आरोपाची तत्काळ शहानिशा करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
प्रत्यक्ष घटनास्थळी...
या घर क्रमांकाची इमारत कथडा परिसरात असून, १ नूतनीकरण झालेल्या या इमारतीला साईसखा असे नाव देण्यात आले आहे. त्या इमारतीला चार मजले आहेत. या इमारतीत सद्यःस्थितीत फक्त ५ सदस्य राहतात. त्यामुळे या आरोपाबद्दल परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
याच परिसरात एक जुनी वसाहत आहे. एका घराच्या जागेत 3 ती वसाहत अस्तित्वात आली आहे. एकाच घर क्रमांकावर असलेल्या या वसाहतीमध्ये अनेक मतदार असू शकतात. तरी त्यांची संख्या ४०० पेक्षा जास्त नसेल, असा दावा येथील रहिवाशांनी केला.
आता आम्ही पाच जण इथे राहतो
"आमच्या घर नंबर ३८२८/२९ चे नूतनीकरण होऊन बरीच वर्षे झाली आहेत. त्या इमारतीत आम्ही भाऊबंद राहात होतो. परंतु आता आम्ही सगळे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी राहायला गेलो आहोत. आज येथे फक्त पाचच व्यक्ती राहतात. त्यामुळे पाटील यांनी केलेल्या आरोपात तथ्य असेल तर निवडणूक आयोगाने ते बाहेर आणावे", असे घरमालक योगेश मांडे म्हणाले.