पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 18:37 IST2025-10-26T18:36:41+5:302025-10-26T18:37:16+5:30
Panvel News: पनवेलमधील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेहांची अदलाबदल झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. खारघरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या २६ वर्षीय सुशांत मल्ला या तरुणाचा मृतदेह चुकीने दुसऱ्या नेपाळी कुटुंबाला देण्यात आला.

पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
-वैभव गायकर
पनवेल - पनवेलमधील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेहांची अदलाबदल झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. खारघरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या २६ वर्षीय सुशांत मल्ला या तरुणाचा मृतदेह चुकीने दुसऱ्या नेपाळी कुटुंबाला देण्यात आला. त्यांनी या मृतदेहाचे अंतिम संस्कारही केले.मात्र पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेह कुटुंबियांना देताना झालेली अक्षम्य चुकीला पोलीसच जबाबदार असल्याचे समोर आले आहे.
दोन्ही मृत व्यक्ती मूळचे नेपाळचे आणि समवयस्क असल्याने हा प्रकार घडला. शवविच्छेदनानंतर रुग्णालयात मृत्यू झालेल्या २५ वर्षीय तरुणाच्या नातेवाईकांनी चुकीचा मृतदेह ओळख करून ताब्यात घेतल्यामुळे पोलिस आणि रुग्णालय प्रशासनावर निष्काळजीपणाचे आरोप सुशांत यांच्या नातेवाईकांनी केले होते.मात्र या नातेवाईंकांनी देखील या घटनेत आपली चुक झाली असल्याचे नंतर मान्य केले.नियमांनुसार मृतदेहाची जबाबदारी घटनेची चौकशी करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची असते.पनवेल शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी देखील यावेळी घटनास्थळी उपस्थित होते.घटनेची गांभीर्य लक्षात घेता पनवेलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक गीते यांनी संबंधित प्रकाराबाबत त्रसदस्यीय समिती स्थापन करण्यात आल्याचे सांगितले.मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर रुग्णालय प्रशासन पोलिसांकडे मृतदेह नातेवाईक सुपूर्द करण्याची जबाबदारी देत असते.या घटनेत देखील असेच झाले.रुग्णालय प्रशासन थेट मृतदेह नातेवाईंकाना देत नसल्याचे देखील डॉ गीते यांनी स्पष्ट केले.मात्र यापुढे अशा घटना घडणार नाहीत याकरिता याबाबत तृसदस्यीय समिती उपाययोजना आखेल.
दरम्यान पनवेल शहर पोलिसांच्या उपस्थितीत झालेल्या याबाबत प्रकाराबाबत माहिती घेण्यासाठी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्याशि संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.