BMC Election: शरद पवार गट मुंबईत कोणाशी करणार युती, उद्धवसेना की काँग्रेस?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 14:10 IST2025-11-21T14:04:46+5:302025-11-21T14:10:00+5:30
Sharad Pawar: एकीकडे मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुंबईत आघाडी करण्यासंदर्भात शरद पवार यांनी भेट घेतली असतानाच दुसऱ्या दिवशी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी मुंबईत उद्धवसेनेबरोबर युतीचे संकेत दिले आहेत.

BMC Election: शरद पवार गट मुंबईत कोणाशी करणार युती, उद्धवसेना की काँग्रेस?
मुंबई : एकीकडे मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुंबईत आघाडी करण्यासंदर्भात शरद पवार यांनी भेट घेतली असतानाच दुसऱ्या दिवशी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी मुंबईत उद्धवसेनेबरोबर युतीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे शरद पवार गट कोणाशी युती करणार, याबद्दल उत्सुकता वाढली आहे.
'आम्ही पुढच्या आठवड्यात युतीसंदर्भात चर्चा करणार आहोत. उद्धव ठाकरे यांच्यासोबतही चर्चा करून निर्णय घेणार आहोत. येत्या ८ दिवसात सगळे चित्र स्पष्ट होईल. आमची भूमिका सगळ्यांना एकत्र घेऊन जायची आहे', असे सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या. उद्धवसेना आणि मनसेची मुंबई महापालिकेत युती होणार, हे स्पष्ट झाल्यानंतर काँग्रेसने आधी स्वबळाची घोषणा केली होती. त्यानंतर बुधवारी शरद पवार यांची भेट घेऊन आघाडी करण्यासंदर्भात चर्चा केली. सुप्रिया सुळेही या बैठकीला उपस्थित होत्या. यासंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची लवकरच सविस्तर चर्चा होणार आहे. अशातच सुप्रिया सुळे यांनी उद्धवसेनेबरोबर युतीचे संकेत दिले आहेत.
काँग्रेसने दिलेला स्वबळाचा नारा प्रत्यक्षात उतरणार?
मुंबईत आतापर्यंत महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी युती होत आली आहे. महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर ही पालिकेची ही पहिलीच निवडणूक आहे. उद्धव सेनेबरोबर युती करण्यास काँग्रेसला कोणतीच अडचण नव्हती. मात्र मनसे उद्धव सेनेबरोबर जाणार असल्याने काँग्रेसची खरी अडचण झाली आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा ही देशाला एकजूट करण्यासाठी काढण्यात आली होती, अशा वेळी उत्तर भारतीयांविरोधात भूमिका घेणारा मनसे पक्ष ज्यांच्याबरोबर आहे त्यांच्यासोबत काँग्रेसने आघाडी केली तर राहुल गांधींच्या भूमिकेलाच छेद दिल्यासारखे होईल, असे काँग्रेसला वाटते. त्यामुळे उद्धव ठाकरेंशीही काँग्रेसला फारकत घ्यावी लागणार आहे. अशात शरद पवार गट उद्धव ठाकरेंबरोबर गेला तर काँग्रेसला मुंबईत एकट्यानेच लढावे लागेल