राज्यात पश्चिम महाराष्ट्राला सर्वाधिक मंत्रिपदे देण्यात आली आहेत. त्या खालोखाल विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणाला प्रत्येकी आठ मंत्रिपदे मिळाली आहेत. शिंदे सरकारमधील जवळपास १२ मंत्र्यांचा पत्ता कापण्यात आला आहे. पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीने ४२ मंत्र्यांना शपथ देत जम्बो मंत्रिमंडळ स्थापन केले आहे. अशातच तळकोकणात भाजपाच्या नितेश राणेंना मंत्रिपद देत, शिवसेनेच्या दिपक केसरकरांचा पत्ता का कापण्यात आला, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.
कोकणात एक योगायोग बनला आहे. राणे आणि सामंत बंधूं हे सलग चार मतदारसंघातून निवडून आले आहेत. यापैकी धाकटे बंधू यापूर्वी आमदार होते, तर ज्येष्ठ बंधू हे पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. मंत्रिपदाच्या शर्यतीत धाकट्यांनी बाजी मारली आहे. आता या राणे आणि सामंत यांना कोणती मंत्रिपदे मिळणार याबाबतची उत्सुकता रत्नागिरी आणि सिंधुदुर्गकरांना लागून राहिली आहे.
इकडे भाजपाने नितेश राणेंना मंत्रिपद देताना शिवसेनेने सावंतवाडीचे आमदार दिपक केसरकर यांना पुन्हा मंत्री केलेले नाही. एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात दिपक केसरकर यांना शालेय शिक्षण मंत्री करण्यात आले होते. तसेच शिवसेनेचे प्रवक्ते देखील होते. परंतू, सिंधुदुर्गमध्ये त्यांना पालकमंत्री करण्यात आले नव्हते. राणेंशी असलेले तणावाचे संबंध याला कारणीभूत होते. लोकसभा निवडणुकीत केसरकर आणि राणे यांनी पुन्हा सख्य दाखवले, ते विधानसभेपर्यंत तसेच होते. शिंदेंच्या बंडावेळी वेळोवेळी मांडलेल्या भुमिकेमुळे मंत्रिपदाबाबत केसरकर देखील आश्वस्त होते. परंतू, मुख्यमंत्री पदावरून नाराज असलेल्या शिंदेंनी गाव गाठले तेव्हा केसरकर शिंदेंना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी शिंदेंनी केसरकर यांना भेट नाकारली होती. मोदींशी आपले चांगले संबंध, मोदींनी आपल्याला भाजपात येण्याची ऑफर दिलेली असे छातीठोकपणे सांगणाऱ्या केसरकरांचे नाव मात्र मंत्रिपदाच्या अंतिम यादीतून वगळण्यात आल्याने जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे.
एक स्पष्ट झाले...कणववलीतून आमदार झालेले नितेश राणे हे भाजपाचे आमदार आहेत. तिसऱ्यांदा ते आमदार झालेले आहेत. केसरकर सावंतवाडी मतदारसंघातून चौथ्यांदा आमदार झाले आहेत. राज्य मंत्री असलेले केसरकर जेव्हा फडणवीस सरकारमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री होते तेव्हा राणे आणि केसरकर वाद चांगलाच रंगला होता. २०१९ मध्ये ठाकरे सरकारमध्ये केसरकर यांना मंत्रिपद देण्यात आले नव्हते. शिंदेंच्या बंडानंतर केसरकर यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले होते. परंतू तेव्हा राणे भाजपात असल्याने केसरकर यांना सिंधुदूर्गचे पालकमंत्री करण्यात आले नव्हते. डोंबिवलीच्या रविंद्र चव्हाण यांना जिल्ह्यात पाठविण्यात आले होते. आता नितेश राणेंना मंत्री करून, तसेच केसरकर यांना डावलून सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वादावर तोडगा काढण्यात आल्याची चर्चा होत आहे. तसेच मोठ्या काळानंतर सिंधुदूर्गचाच आमदार जिल्ह्याचा पालकमंत्री होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.