२०२४ मध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपा ३५० तर एनडीए ४०० जागा जिंकणार, भाजपाच्या बड्या नेत्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 20:51 IST2023-06-02T20:50:26+5:302023-06-02T20:51:23+5:30
Prakash Javadekar: लोकसभा निवडणुकीत भाजपा ३५० तर एनडीए ४०० जागा जिंकेल, असा दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर यांनी केला आहे.

२०२४ मध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपा ३५० तर एनडीए ४०० जागा जिंकणार, भाजपाच्या बड्या नेत्याचा दावा
२०२४ मध्ये होणारी लोकसभेची निवडणूक आता काही महिन्यांवर आली आहे. या निवडणुकीत केंद्रातील सत्ताधारी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांनी कंबर कसली आहे. या निवडणुकीत भाजपाविरोधात सर्व विरोधी पक्षांचं ऐक्य घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे मात्र भाजपाकडून मोठ्या विजयाचा दावा केला जात आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपा ३५० तर एनडीए ४०० जागा जिंकेल, असा दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर यांनी केला आहे.
प्रकाश जावडेकर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, देशातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला पसंत करते. त्यामुळे २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला ३५० आणि एनडीएला ४०० जागा मिळतील आणि आमचा दणदणीत विजय होईल, याची आम्हाला खात्री आहे, असे प्रकाश जावडेकर म्हणाले.
२०१४ आणि २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेससह विरोधी पक्षांना पराभूत करत दणदणीत विजय मिळवला होता. २०१४ मध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवताना २८० हून अधिक जागा जिंकल्या होत्या. तर २०१९ मध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली आपली कामगिरी अधिक उंचावताना तीनशेहून अधिक जागा जिंकल्या होत्या. मात्र २०२४ मध्ये विरोधी पक्षांचं कडवं आव्हान मोदींसमोर असेल, त्यामुळे या कामगिरीची पुनरावृत्ती करताना मोदी आणि भाजपाचा कस लागणार आहे.