भाजपा शिवसेनेला आणि राष्ट्रवादी हा पक्ष काँग्रेसला सोडणार आणि राष्ट्रवादी- भाजपा सोबत सत्तेत बसणार ही स्क्रीप्ट २०१४ मध्येच लिहिली गेली होती. परंतू, गडबड झाली आणि आम्ही मागे राहिलो, असा गौप्यस्फोट अजित पवार राष्ट्रवादीचे नेते, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे.
गोंदियात महायुतीच्यवतीने आयोजित सत्कार समारोप कार्यक्रमांमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी २०१४ मध्ये घडलेल्या राजकारणावर गौप्यस्फोट केला. भाजपासोबत येण्याची खूप आधीपासून आमची आणि मोठ्या साहेबांची (शरद पवार) देखील इच्छा होती, मात्र, गाडी स्लीप होऊन जात होती, असे पटेल यांनी सांगितले.
2014 च्या निवडणुकीत आम्ही काँग्रेसचा हात सोडायचा आणि भाजपवाल्यांनी शिवसेनेचा हात सोडायचा असे ठरलेले होते. 2014 च्या निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी मी स्वतः बाहेरून पाठिंबा देत असल्याची घोषणा केली आणि आमच्या सहकार्याने हरिभाऊ बागडे स्पीकर म्हणून निवडून आले. पण पुन्हा गडबड झाली आणि आम्ही मागे राहून गेलो, असे पटेल म्हणाले.