नाराजीचा भूकंप! एकनाथ शिंदे वगळता शिंदेसेनेचे एकही मंत्री कॅबिनेट बैठकीला हजर नाहीत, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 14:39 IST2025-11-18T14:36:32+5:302025-11-18T14:39:13+5:30
शिंदेसेनेच्या नाराजीचे पडसाद कॅबिनेट बैठकीत उमटले, तिथे शिंदेसेनेचे एकही मंत्री बैठकीला हजर नव्हते.

नाराजीचा भूकंप! एकनाथ शिंदे वगळता शिंदेसेनेचे एकही मंत्री कॅबिनेट बैठकीला हजर नाहीत, कारण...
मुंबई - राज्यात एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. त्यात सत्ताधारी भाजपा आणि शिंदेसेनेत अनेक ठिकाणी रस्सीखेच सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी भाजपा शिंदेसेनेच्या नेत्यांना पक्षात घेण्याचं काम करत आहे. त्यात आज सकाळी शिंदेसेनेचा गड असणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली येथील शिंदेसेनेला खिंडार पाडण्याचं काम भाजपाने केले. त्यावरून शिंदेसेनेत नाराजी पसरली आहे. त्याचे पडसाद राज्याच्या कॅबिनेट बैठकीत उमटल्याचे दिसून येते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकनाथ शिंदे वगळता एकही मंत्री बैठकीला हजर नव्हते हे दिसून आले.
कल्याण डोंबिवलीतील मिशन ऑपरेशन लोटसवरून शिंदेसेनेत नाराजी पसरली आहे. स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी शिंदेसेनेविरोधात भाजपाची लढाई आहे. त्यात रायगड येथेही अजित पवारांना सोबत घेऊन शिंदेसेनेविरोधात भाजपा उतरली आहे. त्यात कल्याण डोंबिवलीत एकमेकांकडे पदाधिकारी, नेते आपल्या पक्षात आणण्यासाठी दोन्ही पक्ष प्रयत्नशील आहे. त्यात आज डोंबिवलीतील दिवंगत वामन म्हात्रे यांचे सुपुत्र अनमोल म्हात्रे, अश्विनी म्हात्रे यांच्यासह अनेक कार्यकर्ते भाजपात दाखल झाले आहेत. त्यामुळे शिंदेसेनेत प्रचंड नाराजी पसरली आहे.
शिंदेसेनेच्या नाराजीचे पडसाद कॅबिनेट बैठकीत उमटले, तिथे शिंदेसेनेचे एकही मंत्री बैठकीला हजर नव्हते. हे मंत्री मुख्यमंत्र्यांच्या दालनात बसले होते हे समोर आले. या प्रकरणावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी आम्ही नाराज नाही, आमची पक्षाची बैठक होती, त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत गेलो नाही असं सांगितले. मात्र पक्षाच्या बैठकीसाठी कॅबिनेटमध्ये न जाणे हे कितपत योग्य आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, ज्या क्षणी शिंदेंनी गुवाहाटीचा मार्ग स्वीकारला त्याच क्षणी हे सगळे ठरले होते. दादा भुसेंसमोर अद्वय हिरे यांना पक्षात घेत आहेत. शिंदेसेनेच्या नेत्यांसमोर एक एक आव्हान उभे केले जातेय. त्यामुळे हे सगळे नेते नाराज आहेत. एका मुख्यमंत्रिपदासाठी शिंदेंनी या सर्व नेत्यांना राजकीय आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे. अमित शाह इथं येऊन आम्हाला कुणाच्या कुबड्यांची गरज नाही हे सांगितले. आता एक एक प्रकरण समोर येत आहे त्यातून अजित पवार, एकनाथ शिंदे यांना बाजूला सारण्याचं काम भाजपाने सुरू केले आहे. त्यामुळे ज्यांचे कालपर्यंत कौतुक करत होता, ते आज जे करतेय त्यांचे गोड मानून घ्या असा टोला उद्धवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदेसेनेला लगावला.