माधव भांडारींची पुन्हा संधी हुकली; भाजपने विधान परिषद निवडणुकीसाठी या तिघांना संधी दिली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 10:59 IST2025-03-16T10:58:46+5:302025-03-16T10:59:05+5:30
BJP Vidhan Parishad Election Candidate List: माधव भांडारी यांचे नाव यापूर्वीही अनेकदा विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आले होते. मात्र वारंवार चर्चा होऊनही अद्याप त्यांना विधिमंडळात संधी मिळालेली नव्हती.

माधव भांडारींची पुन्हा संधी हुकली; भाजपने विधान परिषद निवडणुकीसाठी या तिघांना संधी दिली
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या ५ जागांसाठी २७ मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी भाजपाने तीन उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये ज्येष्ठ नेते माधव भांडारी यांना पुन्हा डावलण्यात आले आहे.
महायुतीत भाजपकडून पाचपैकी तीन जागांवर उमेदवार देण्यात येणार होते. तर एकनाथ शिंदे गट एक व अजित पवार गट एक अशा पाच जागा वाटून घेण्यात आल्या होत्या. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भांडारी यांच्यासह दादाराव केचे आणि अमरनाथ राजूरकर यांची नावे प्रदेश पातळीवरून केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठवण्यात आली होती.
माधव भांडारी यांचे नाव यापूर्वीही अनेकदा विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आले होते. मात्र वारंवार चर्चा होऊनही अद्याप त्यांना विधिमंडळात संधी मिळालेली नव्हती. आता त्यांना संधी देऊन ज्येष्ठ नेत्यांना न्याय देण्यात येईल अशी चर्चा होती. परंतू, या निवडणुकीतही भाजपाने भांडारींना स्थान दिलेले नाही.
भाजपाने तीन उमेदवारांची यादी आज जाहीर केली. यामध्ये संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे यांची वर्णी लागली आहे. भाजपाकडे स्पष्ट बहुमत आहे, यामुळे पुरेशी मते असल्याने हे तिन्ही उमेदवार निवडून येणार आहेत.
भारतीय जनता पार्टी की केन्द्रीय चुनाव समिति ने महाराष्ट्र में होने वाले विधान परिषद् के उप-चुनाव हेतु निम्नलिखित नामों पर अपनी स्वीकृति प्रदान की है। pic.twitter.com/YRKcanbI6I
— BJP (@BJP4India) March 16, 2025
कोणत्या नेत्यांमुळे रिक्त झाल्या विधानपरिषदेच्या जागा?
आमदार आमश्या फुलाजी पाडवी यांचा विधानपरिषद सदस्य म्हणून ७ जुलै २०२८ पर्यंत कालावधी, प्रविण प्रभाकरराव दटके (१३ मे २०२६), राजेश उत्तमराव विटेकर – (२७ जुलै २०३०), रमेश काशिराम कराड – (१३ मे २०२६) आणि गोपीचंद कुंडलिक पडळकर यांचा कार्यकाळ समाप्ती १३ मे २०२६ असा आहे. मात्र, या सदस्यांची २३ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र विधानसभा सदस्य म्हणून निवड झाल्याने भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेकरिता काही दिवसांपूर्वी द्वैवार्षिक निवडणूक कार्यक्रम घोषित केला.