अजित पवारांची इच्छा असेल तर त्यांनाही दिल्ली घेऊन जाऊ; भाजपचा खोचक टोला
By अजित मांडके | Updated: August 6, 2022 15:30 IST2022-08-06T15:28:33+5:302022-08-06T15:30:51+5:30
अजित पवार आणि उद्धव ठाकरेंना जे जमलं नाही तें काम शिंदे फडणवीस जोडी करेल, असा विश्वास भाजपने व्यक्त केलाय.

अजित पवारांची इच्छा असेल तर त्यांनाही दिल्ली घेऊन जाऊ; भाजपचा खोचक टोला
ठाणे: महाविकास आघाडीने अडीच वर्षात काहीच केलं नाही. त्यांच्यापेक्षा चारपट चांगल काम एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस पुढील अडीच वर्षात करतील. विरोधी पक्षकडे बोलण्यासाठी काहीच मुद्दे नसल्याने तें केवळ मंत्रीमंडळ विस्ताराचा मुद्दा बाहेर काढत आहेत, असा पलटवार भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हें महाराष्ट्राच्या विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी दिल्ली दौऱ्यावर जातात. आजही ते नीती आयोगाच्या बेठकीसाठी गेले आहेत. अजित पवार आणि उद्धव ठाकरेंना जे जमलं नाही तें काम शिंदे फडणवीस जोडी करेल. त्यातही अजित पवार यांनाही दिल्ली वारी करायची इच्छा असल्यास त्यांनी शिंदे आणि फडणवीस यांना तसे सांगावे म्हणजे त्यांनाही तें बरोबर घेऊन जातील, असा टोला बावनकुळे यांनी लगावला.
आम्ही आमच्या काळात विकास केला आहे. मागील अडीच वर्षात तो थांबला होता तो विकास करण्याचे काम शिंदे फडणवीस करत आहेत. परिणामी अजित पवरांनी आरोप न करता सक्षम विरोधी पक्षनेत्यांची भूमिका बजवावी, असा सल्ला बावनकुळे यांनी दिला. तसेच राज्यातील १६ मतदार संघांची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यांना दिली आहे. कल्याण लोकसभा मतदार संघाकरता अनुराग ठाकूर यांची नेमणूक करण्यात आली आहे. ३ दिवसांचा २१ कलमी कार्यक्रम असणार आहे. मोदींजींची योजना लोकांपर्यंत पोहोचली की नाही याबाबत केंद्रीय मंत्री आढावा घेणार आहेत, अशी माहितीही बावनकुळे यांनी दिली.