मुंबईतील मनसेच्या मोर्चाला भाजपने वाहने पुरविली : सुषमा अंधारेंचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 10:58 IST2020-02-11T10:54:29+5:302020-02-11T10:58:53+5:30
नागरिकत्व कायद्याला सोलापुरात विरोध; संविधान बचाओ आंदोलनात महिलांचा मोठा सहभाग

मुंबईतील मनसेच्या मोर्चाला भाजपने वाहने पुरविली : सुषमा अंधारेंचा आरोप
सोलापूर : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे राजकारण आता संपलेले आहे. त्यांनी लोकांची माथी भडकविण्याचे काम करु नये, असे म्हणताना काही दिवसांपूर्वी त्यांनी काढलेल्या मोर्चाला भाजपने वाहने पुरविल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या प्रा. सुषमा अंधारे यांनी सोलापुरात केला.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सीएए, एनआरसी, एनपीआर या विरोधात संविधान बचाओ कृती समितीतर्फे महिला आंदोलन करत आहेत. या आंदोलनात उपस्थित सभेला संबोधित करताना सुषमा अंधारे यांनी भाजप तसेच राज ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली. त्या म्हणाल्या, तलवारीबद्दल राज ठाकरे तुम्ही बोलू नकात. तलवारीविषयी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी बोलावे. महाराजांचे मावळे हे मुस्लीम, आलुतेदार, बलुतेदार असे सर्व समाजातील होते. जे खºया अर्थाने शिवरायांचे विचार पुढे नेतात. त्यांनाच बोलायचा अधिकार आहे. निवडणुकांपूर्वी लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे आता काय झाले तुम्हाला ?. राज ठाकरे हे ‘बंद कर रे तो व्हिडीओ..उचल तो दगड’ असे फक्त चर्चेत राहण्यासाठी करतात.
वर्षाला दोन कोटी रोजगार देतो म्हणणारे पंतप्रधान मोदी यांनी प्रत्यक्षात रोजगार दिलाच नाही. देशात अनेकजण बेरोजगार आहेत. आपण त्यांना प्रश्न विचारु नये, यासाठी हा खटाटोप आहे. धार्मिक दंगल घडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या मतदान कार्डामुळे तुम्ही निवडून आलात त्या मतदान कार्डाला अवैध ठरवत आहात. या विरोधात मुस्लीमच नाही तर इतर लोकही काम करत आहेत.
अल्पसंख्याकांनी भाजपपासून वेगळे व्हावे
- न्यायालयाने चार आठवड्याचा वेळ दिला आहे. हे तीन आठवडे संयमाची परीक्षा पाहणारे आहेत. सर्व स्त्रियांनी तीन आठवडे आंदोलन अजून चालवायचे आहे़ पुढच्या टप्प्यामध्ये मुख्य चौकात बोर्डावर स्वाक्षरी अभियान घेऊ. कुठल्याही पक्षाच्या नेत्याने पाठिंबा द्यायचा असेल तर त्यांनी चौकात येऊन पाठिंबा द्यावा. ज्या भाजपने नागरिकत्व संशोधन कायदा बनविला. त्या पक्षासोबत अल्पसंख्याक लोक जे खासदार, आमदार, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर पालिका, तालुका पंचायतीत असतील त्यांनी भाजपतून बाहेर पडून आंदेलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन प्रा. अंधारे यांनी केले.