“...तर संजय राऊतांची खासदारकी रद्द होऊ शकते”; भाजप नेत्याचे सूचक विधान, नेमके प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2023 19:34 IST2023-08-06T19:33:29+5:302023-08-06T19:34:17+5:30
Sudhir Mungantiwar Vs Sanjay Raut: पोलीस यंत्रणांनी संजय राऊतांच्या घरी जाऊन चौकशी करायची आवश्यकता आहे किंवा त्यांना पोलीस स्टेशनला बोलावून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

“...तर संजय राऊतांची खासदारकी रद्द होऊ शकते”; भाजप नेत्याचे सूचक विधान, नेमके प्रकरण काय?
Sudhir Mungantiwar Vs Sanjay Raut: देशात मणिपूरसह राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीच्या सीमेवर दंगली घडवण्यात येत आहेत. यानंतर आता महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा कट सुरु आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे गुरुजी मंडळ तणाव निर्माण करत आहे, असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून, संजय राऊतांची राज्यसभेची खासदारकी रद्द होऊ शकते, असे सूचक विधान भाजप नेत्याने केले आहे.
मणिपूर, राजस्थान, हरियाणा आण दिल्लीच्या सीमेवर दंगली घडवण्यात येत आहे. काही ठिकाणी झाल्या आहेत. महाराष्ट्रात तशा दंगली घडाव्या म्हणून देवेंद्र फडणवीस, भाजप आणि त्यांचे गुरुजी मंडळ तणाव निर्माण करत आहे. या राज्यात दंगलीची आग लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण जनता सूज्ञ आहे. अशा कटकारस्थानाला बळी पडणार नाही, या शब्दांत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला होता. यावर भाजप नेते आणि राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर देताना, संजय राऊतांची खासदारकी रद्द होऊ शकते, असा दावा केला आहे.
...तर संजय राऊतांची खासदारकी रद्द होऊ शकते
पोलिसांनी यासंदर्भातील माहिती तपासण्यासाठी त्यांच्याकडे गेले पाहिजे. पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, विशेष तपास पथकाने (SIT) त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडे असलेली माहिती तपासली पाहिजे. मुख्यमंत्री महोदयांना याचे स्वतंत्र पत्र देणार आहे. त्यांच्याकडे असलेली माहिती तपासण्याची मागणी करणार आहे. कारण जर यासंदर्भातील माहिती असेल, तर ती लपवता येत नाही. अन्यथा राज्यसभेची खासदारकी रद्द होईल. कारण राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतो, तेव्हा अशा गंभीर स्वरुपाची माहिती जी त्यांच्याकडे असते, ती सांगावीच लागते. पोलीस यंत्रणांनी त्यांच्या घरी जाऊन चौकशी करण्याची आवश्यकता आहे किंवा त्यांना पोलीस स्टेशनला बोलावून त्यांच्याकडे असलेली माहिती घेऊन अशा तऱ्हेने होऊ नये, याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, महात्मा फुले, महात्मा गांधी आणि साईबाबा यांचे महाराष्ट्र घडवण्यात योगदान आहे. त्यांच्यावर असे विधान करणे विकृती आहे. एखादी व्यक्ती अशा पद्धतीने विधान करत असेल तर सरकारने त्याच्यावर जाणीवपूर्वक कारवाई केली पाहिजे. ते तुमचे गुरुजी असतील तर तुम्ही त्यांची पूजा करत बसा, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली होती.