दक्षिणायनसाठी भाजपची रणनीती

By Admin | Updated: August 29, 2014 00:58 IST2014-08-29T00:58:29+5:302014-08-29T00:58:29+5:30

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या भरघोस यशानंतर आता भाजपला कुठल्याही परिस्थितीत दक्षिण नागपूरची जागा शिवसेनेला सोडायची नाही. मात्र, जागा वाटपात ही जागा पुन्हा एकदा शिवसेनेला

BJP Strategy for Dakshina | दक्षिणायनसाठी भाजपची रणनीती

दक्षिणायनसाठी भाजपची रणनीती

शिवसेनेला जागा गेल्यास अपक्ष रिंगणात उतरणार
नागपूर : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या भरघोस यशानंतर आता भाजपला कुठल्याही परिस्थितीत दक्षिण नागपूरची जागा शिवसेनेला सोडायची नाही. मात्र, जागा वाटपात ही जागा पुन्हा एकदा शिवसेनेला सुटली तर दावेदारांपैकी एकाला अपक्ष म्हणून रिंगणात उतरविण्याची तयारी स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी चालविली आहे. भाजप नेत्यांनी मात्र कोणत्याही परिस्थितीत युती धर्माचे पालन केले जाईल, असे स्पष्ट केले आहे.
दक्षिण नागपूरची जागा शिवसेनेच्या कोट्यात आहे. युतीत ही जागा सेनाच लढेल, असे सेनेचे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख डॉ. दीपक सावंत यांनी नागपुरात स्पष्ट केले आहे. शिवसेनेतही दावेदारांची यादी मोठी आहे. माजी उपमहापौर व सेनेचे जिल्हाध्यक्ष शेखर सावरबांधे, माजी उपमहापौर किशोर कुमेरिया, किरण पांडव यांच्यासह राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश घेतलेले किशोर कन्हेरे यांची नावे आघाडीवर आहेत. उमेदवारीसाठी ‘मातोश्री’वर थेट हजेरी लावणाऱ्या इच्छुकांची दुसरी यादीही मोठी आहे.
लोकसभा निवडणुकीत दक्षिणमध्ये भाजपला तब्बल ६० हजार मतांची आघाडी मिळाली होती. हे यश भाजप कार्यकर्त्यांचे आहे, त्यामुळे या वेळी ही जागा भाजपलाच मिळावी, असा आग्रह स्थानिक भाजप नेत्यांनी धरला आहे. भाजपमध्येही इच्छुकांची यादी मोठी आहे. नासुप्रचे विश्वस्त डॉ. छोटू भोयर, जलप्रदाय समितीचे अध्यक्ष सुधाकर कोहळे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अविनाश ठाकरे, नुकतेच भाजपमध्ये प्रवेश घेतलेले माजी आ. मोहन मते, माजी आ. अशोक मानकर आदी कंबर कसून तयार आहेत. सर्वांनी आपापल्या पद्धतीने कामाला सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)
भाजपचा छुपा करार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिणमधील भाजप नेत्यांनी आपसात एक छुपा करार केला आहे. जागा भाजपच्या कोट्यात आली तर पक्ष उमेदवारी देईल त्याला पाठबळ द्यायचे. शिवसेनेलाच जागा गेली तर मात्र आपल्यापैकी एकाला अपक्ष म्हणून रिंगणात उतरवून सर्वांनी त्याच्यासाठी काम करायचे. यासाठी काही इच्छुक नेत्यांनी विविध एजन्सींकडून सर्वेक्षणही करून घेतले आहे.

Web Title: BJP Strategy for Dakshina