Chandrashekhar Bawankule: महापालिका आणि जिल्हा परिषदांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने आज मोठा निर्णय दिला. ओबीसींना २०२२पूर्वी असलेले आरक्षण कायम ठेवून सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला चार महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. चार आठवड्यांच्या आत निवडणुकांसदर्भातील अधिसूचना काढण्याचेही आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. याच मुद्द्यावर बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट केले.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट आपण सारे पाहत होतो. लोकशाही व्यवस्थेला बळकट करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होणार आहेत. कार्यकर्त्यांच्या हक्काचे दान आज सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या पदरात टाकले. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी, चौंडी येथे आज महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ आहे. या पावनभूमीत असताना हा निर्णय झाला. मी न्यायालयाचे मन:पूर्वक स्वागत करतो," असे बावनकुळे म्हणाले.
फडणवीसांच्या प्रयत्नांना यश
"पंतप्रधान नरेंद्र मोदीनीं विकसित भारताचा संकल्प केला आहे. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर महाराष्ट्र पुढे नेत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकसित महाराष्ट्राचे सुकाणु हाती घेतले आहे. या निवडणुकांमुळे विकसित महाराष्ट्राला गती मिळेल. मुख्यमंत्री फडणवीस यांनी कायदेपंडितांशी सतत सल्लामसलत केली. आज त्याला यश आले," असे त्यांनी नमूद केले.
कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारा निर्णय
"गेल्याच आठवड्यात जातीनिहाय जनगणना करण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला. जनतेच्या आशा आकांक्षाना शक्ती देण्याचे काम सरकार व न्यायालयाकडून होत आहे. येणारी निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. तन मन धनाने कार्यकर्ते समाजसेवा करत असतात. त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू आज नक्कीच फुलले असणार. मी सर्व कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. जय शिवाजी जय भवानी.. यळकोट यळकोट जय मल्हार," असे मत त्यांनी व्यक्त केले.