‘मुंह में राम, बगल में राहुल’, उद्धव ठाकरेंना भाजपचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2022 16:34 IST2022-10-19T16:33:03+5:302022-10-19T16:34:33+5:30
उद्धव ठाकरे आता राहुल गांधींच्या पदयात्रेसाठी पायघड्या घालण्यासाठी घराबाहेर पडणार, हा उद्धव ठाकरे यांच्यावर काळाने उगवलेला सूड आहे, अशी खोचक टीका प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली.

‘मुंह में राम, बगल में राहुल’, उद्धव ठाकरेंना भाजपचा टोला
मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या भारत जोडो पदयात्रेचे निमंत्रण स्वीकारले आहे. यावरून भाजपानेउद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रत्येक नेत्याला मातोश्रीवर येण्यासाठी भाग पाडणारा बाळासाहेबांचा आदरयुक्त दबदबा उद्धव ठाकरेंनी रसातळाला पोहोचवला आहे. पक्ष, संघटना किंवा कार्यकर्त्यांसाठी कधीही घराबाहेर न पडलेले उद्धव ठाकरे आता राहुल गांधींच्या पदयात्रेसाठी पायघड्या घालण्यासाठी घराबाहेर पडणार, हा उद्धव ठाकरे यांच्यावर काळाने उगवलेला सूड आहे, अशी खोचक टीका प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बुधवारी केली.
भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे नूतन अध्यक्ष श्री.नरेंद्र पाटील यावेळी उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले की, या आधी भाजपसोबत युती असताना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे कधी रस्त्यावर उतरले नाहीत. लालकृष्ण अडवाणी-मुरली मनोहर जोशींच्या रथयात्रांत तर उद्धव ठाकरे फिरकले देखील नाहीत. हात उंचावून जाहीर सभांमध्ये हिंदुत्वाच्या पोकळ गर्जना करणारे उद्धव ठाकरे बाबरी प्रकरणाच्या वेळी शिवसैनिकांना रस्त्यावर उतरवून घरात टीव्ही बघत होते, तर तीन वर्षांपूर्वीच्या देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत सहभागी झाले नव्हते.
याचबरोबर, ‘मुंह मे राम, बगल मे राहुल’ ही म्हण उद्धव ठाकरे यांच्यासाठीच शब्दशः तयार झाली असावी असा टोला लगावत केशव उपाध्ये म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना रामाची नाही, तर राहुलची आरती आवडू लागली आहे. राहुल गांधींच्या पदयात्रेस हजर राहुन उद्धव ठाकरे आपल्या काँग्रेसनिष्ठेचा नजराणा सोनिया गांधींना देणार आहेत का, असा सवालही केशव उपाध्ये यांनी केला.
भारत जोडो पदयात्रेचे निमंत्रण
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या भारत जोडो पदयात्रेचे निमंत्रण स्वीकारले आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात आदींनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे तर सिल्व्हर ओक येथे शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी राहुल गांधींची ही यात्रा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणार असून आपणही या यात्रेत सहभागी व्हावे, असे निमंत्रण काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उभय नेत्यांना दिले आहे.