सर्वाधिक संख्याबळ असतानाही भाजपने सत्तास्थापनेचा दावा न करता गुरुवारी संध्याकाळी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. तेराव्या विधासभेची मुदत ९ नोव्हेबर रोजी संपत असल्याने तसे करणे गरजेचेच होते. मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पर्यायी व्यवस्था होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्यास त्यांना सांगितले आहे. राज्याला भाजपच्याच नेतृत्वाखाली नवे सरकार आम्ही देऊ, असा दावा फडणवीस यांनी राजीनाम्यानंतर केला. सध्यातरी कोणीच सत्तास्थापनेचा दावा केलेला नाही. त्यामुळे आता कोणकोणती सत्ता समीकरणे समोर येतात याबाबत उत्सुकता आहे. सध्या राज्यपालांनी मला काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करायला सांगितले आहे, पुढे राष्ट्रपती राजवट वा अन्य कोणताही निर्णय राज्यपाल घेतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.


मोदींवरील टीका थांबविली तरच सेनेशी चर्चा - फडणवीस

। चर्चेसाठी फोन केला पण त्यांनी घेतला नाही
। बोलणी थांबण्यास शिवसेनाच जबाबदार
। मुख्यमंत्रिपदाचा शब्द कधीही दिला नव्हता

मुंबई : आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील टीका शिवसेनेने थांबविली तरच आता शिवसेनेशी चर्चा करु. ते टीका सुरूच ठेवणार असतील तर अशा युतीत आम्हाला रस नाही, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी शिवसेनेला ठणकावून सांगितले.
मोदी हे जागतिक नेते आहेत. त्यांच्यावर तसेच भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर शिवसेनेचे नेते आणि त्यांच्या मुखपत्रातून सातत्याने टीका केली जाते. भाजपच्या कोणत्याही नेत्याने कधीही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका केली नाही. खोटे बोलणाऱ्यांशी चर्चा नाही, सर्व पर्याय खुले - उद्धव ठाकरे

। अमित शहांनी मातोश्रीवर दिला होता शब्द
। गोड बोलून आम्हाला संपविण्याचा प्रयत्न
। शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार, यावर मी ठाम

मुंबई : शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्याचा फॉर्म्युला अमित शहा व माझ्यात मातोश्रीवरच झाला होता. मुख्यमंत्री त्यावेळी उपस्थित होते. आता मुख्यमंत्री गोड बोलून आम्हाला संपविण्याचा प्रयत्न करत आहेत. मी शिवसेनाप्रमुखांचा मुलगा आहे, मी खोटे बोलणार नाही. खोटारडेपणाचा आरोप घेऊन जनतेसमोर कधीच जाणार नाही. मला खोटे संबंध ठेवायचचे नाहीत, शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार या भूमिकेवर मी ठाम आहे, असे उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. आमच्यापैकी कोणाचीच मदत न घेता भाजपाचे सरकार येणार असा त्यांचा दावा कोणत्या आधारावर आहे हे माहिती नाही.पण माझयाही समोरचे सर्व पर्याय खुले आहेत अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रतिहल्ला केला.भाजपा खोटारडेपणा मान्य करत नाही तोपर्यंत चर्चा नाही असेही त्यांनी सुनावले.

समसमानमध्ये मुख्यमंत्रिपद येत नाही का? लोकसभेच्या आधी देखील युतीची चर्चा झाली होती. त्यात शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देण्याचा प्रस्ताव भाजपने दिला होता.मात्र मी शिवसेनाप्रमुखांना शिवसेनेचाच मुख्यमंत्री एक दिवस बसवेन असे वचन दिले आहे.उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याइतका मी लाचार नसल्याचे सांगून त्या चर्चेतून मी उठून आलो होतो.नंतर अमित शहा मातोश्रीवर आले.शिवसेनाप्रमुखांच्या खोलीतच आमची बैठक झाली.त्यातच अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल हे ठरले.पण हे आता जाहीर करूया नको तसे केले तर मला पक्षात अडचण होईल असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.तेव्हा शब्दांचे खेळ करत त्यांनी पद आणि जबाबदारीचे समसमान वाटप होईल असे जाहीर केले.पद या संज्ञेत मुख्यमंत्रीपद येत नाही काय?

गोड बोलून संपविण्याचा प्रयत्न
गोड बोलून यांनी आम्हाला संपविण्याचा प्रयत्न केला.पण मी शिवसेनाप्रमुखांचा मुलगा आहे.मी कधीच खोटे बोलणार नाही.आणि खोटारडेपणाचा आरोप घेउन तर शिवसैनिक आणि जनतेसमोर कधीच जाणार नाही.त्यानंतर दिवाळीच्या दिवशी पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत असा कोणताही फॉर्म्युला ठरला नसल्याचे विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.ते मला धक्का देणारे होते म्हणूनच मी स्वत: चर्चा थांबविली.भाजपाला मी शत्रू मानत नाही पण त्यांनी खोटारडेपणाचा आरोप करू नये असेही ठाकरे म्हणाले.

टीका करणारे चौटाला कसे चालतात?
मी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कधीच वैयक्तिक टीका केलेली नाही.धोरणात्मक बाबींवर निश्चितच बोललो पण वैयक्तिक कधीच बोललो नाही.छत्रपती उदयनराजे भोसले काय बोलले होते मोदींबाबत हरयाणातले दुष्यंत चौटाला काय बोलले होते? ते चालते, उदयनराजे काय बोलले ते चालते का असा सवाल करून उद्धव यांनी चौटालांच्या भाषणाची क्लिप दाखविली. युती करताना १२४ जागा दिल्या ती अडचणही मी समजून घेतली.केंद्रात अवजड उद्योग हेच खाते पुन्हा दिले.मला अमित शहा यांनी खात्याबददल विचारले होते पण मी अमूक एक खाते द्या असेही म्हटले नाही. तर काम करायला कोणतेतरी चांगले खाते दया असे म्हणालो होतो.पण पुन्हा एकदा तेच खाते शिवसेनेला देण्यात आले.साताऱ्याची लोकसभेची जागादेखील शिवसेनेच्या वाट्याची होती.पण यांनी परस्पर उदयनराजेंशी बोलणी करून ती जागा स्वत:कडे घेतली तेव्हाही मी काही बोललो नाही.उलट ३७० कलम रद्द केले तेव्हा मी मोदींचे जाहीर कौतुक केले,मिठाई वाटणारा मीच होतो असेही उदधव ठाकरे म्हणाले.

माझ्यात आणि मोदींमध्ये काडी घालण्याचा प्रकार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोनदा जाहीर भाषणांत माझा लहान भाऊ म्हणून उल्लेख केला.आमचे भावाभावाचे नाते आहे.मोदींनी मला छोटा भाऊ म्हटल्यानंतर कोणाच्या तरी पोटात गोळा आला. आता या नात्यात काडी घालून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे महत्वाचे विधानही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.उलट लोकसभेसाठी दोन हिंदुत्ववादी शक्ती एकत्र आल्याचा आनंदच मला होत होता. पण गंगा साफ करताकरता यांची मनेच कलुषित झाल्याचेही ते म्हणाले.

आमच्यासाठी सर्व पर्याय खुले
भाजपाने लवकरात लवकर सत्ता स्थापनेचा दावा करावा.अन्यथा आमच्या समोरीलही सर्व पर्याय खुले असल्याचा इशारा देताना उद्धव ठाकरे म्हणाले,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाचेच सरकार येणार असल्याचा दावा कशाच्या आधारे करत आहेत हे माहिती नाही.ते दावा करतात पण आम्ही पयार्यांचा विचार केला की गुन्हेगार ठरतो.काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा केल्याचा आरोप करतात.पण आम्ही लपूनछपून काही करत नाही असा टोलाही उदधव ठाकरे यांनी लगावला.

Web Title: BJP-Shiv Sena alliance lost; Fadnavis caretaker CM in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.