भाजप-शिंदेसेना एकत्रच; अजित पवार गट मात्र 'मैत्रीपूर्ण' वेगळा लढणार; लोकसभा, विधानसभेला एकत्रच लढले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 12:37 IST2025-12-16T12:36:53+5:302025-12-16T12:37:16+5:30
लोकसभा, विधानसभेला भाजप शिंदेसेना आणि अजित पवार गट एकत्र लढले होते पण नगरपरिषदेला युती नव्हती.

भाजप-शिंदेसेना एकत्रच; अजित पवार गट मात्र 'मैत्रीपूर्ण' वेगळा लढणार; लोकसभा, विधानसभेला एकत्रच लढले
मुंबई/पुणे : महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेनेत युती असेल पण त्यांचा तिसरा मित्रपक्ष असलेला अजित पवार गट वेगळा लढणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बाब पुण्यात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली.
अजित पवार यांचा पक्ष वेगळा लढेल पण आम्ही त्यांच्याशी मैत्रीपूर्ण लढत करू असे सांगत फडणवीस यांनी महायुतीची दिशा स्पष्ट केली. त्यादृष्टीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात गेल्या आठवड्यात नागपुरात दीड तास चर्चा झाली होती. त्या आधी फडणवीस, शिंदे, चव्हाण आणि मंत्री बावनकुळे यांच्यात चर्चा झाली होती.
लोकसभा, विधानसभेला भाजप शिंदेसेना आणि अजित पवार गट एकत्र लढले होते पण नगरपरिषदेला युती नव्हती. मात्र महापालिकेसाठी एकत्र येण्याचे भाजप-शिंदेसेनेने ठरविले आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी त्रास करून घेऊ नये
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठी पंतप्रधान होण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर फडणवीस म्हणाले, आतापर्यंत वेगवेगळ्या नेत्यांना स्वप्न पडत होती, त्यांना साक्षात्कार होत होते, हे आम्ही पहिले आहे. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा ज्येष्ठ नेत्यांना अशा प्रकारे साक्षात्कार होत असेल, तर हे चांगले नाही. असा विचार करून त्यांनी त्रास करून घेऊ नये, असेही ते म्हणाले.
मतदार यादीतील घोळ दूर झाल्याशिवाय निवडणूक घेऊ नये, अशी मागणी होत असल्याच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, मतदार याद्यांमध्ये घोळ आहे, हे आम्ही देखील दाखवले आहे. पण, त्यासाठी निवडणुका घ्यायच्या नाहीत, असे करता येणार नाही. हा घोळ संपवण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढील काळात या याद्या ब्लॉक चेनमध्ये टाकाव्यात.
ठाकरे बंधू एकत्र आले, तरी मुंबईकर आमच्यासोबत
आमचा कारभार, आम्ही केलेला विकास आणि मराठी माणसाचे आम्ही जोपासलेले हित हे सामान्य मुंबईकरांनी पाहिले आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आले, तरीही मुंबईकर आमच्या सोबत राहतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
मुंबई महापालिकेत आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत, त्यामुळे कोणीही एकत्र आले, तरी महायुतीला फटका बसणार नाही, असेही ते म्हणाले.
पक्ष प्रवेशाचे निर्णय स्थानिक पातळीवर
१. राज्यात सर्वत्र आमच्या पक्षात येणाऱ्या तरुणांचा ओघ मोठा आहे. कुणाला पक्षात घ्यायचे आणि कुणाला नाही, हे आमच्या पक्षाचे अध्यक्ष व त्या-त्या ठिकाणचे शहराध्यक्ष ठरवतील.
२. संपूर्ण राज्यासाठी एकच निर्णय घेता येणार नाही. एकमेकांचे लोक घ्यायचे नाहीत, असे आमचे व एकनाथ शिंदे यांचे ठरल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.