विदर्भात भाजप-शिंदेसेना युती तुलनेने सोपी; चर्चा सुरू झाली, तोडगा लवकरच निघणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 09:44 IST2025-12-18T09:43:40+5:302025-12-18T09:44:32+5:30
भाजपचे चारही महापालिकांत प्राबल्य, सेनेची तडजोड?

विदर्भात भाजप-शिंदेसेना युती तुलनेने सोपी; चर्चा सुरू झाली, तोडगा लवकरच निघणार!
मुंबई: भाजप आणि शिंदेसेनेत महापलिका निवडणुकीसाठी युती होणार हे नक्की झाले असले तरी मुंबई, ठाण्याच्या पट्ट्यात या दोन पक्षांमध्ये जागावाटपाबाबत प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. मात्र, भाजपचा प्रभाव असलेल्या विदर्भात दोन पक्षांत युती होणे तुलनेने सोपे असल्याचे चित्र आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून युतीसाठी प्रत्येक महापालिकेत त्यांच्याकडून चर्चेला कोण राहील याची यादी घेऊन ती प्रत्येक महापालिकेतील भाजपकडून चर्चा करणार असलेल्या नेत्यांना पाठविली आहे. युतीचा निर्णय लवकर करा, घोळ घालू नका असे निर्देशही चव्हाण यांनी दिले आहेत. नागपूर महापालिकेत भाजपने गेल्यावेळी एकहाती सत्ता मिळविली होती. मुंबईप्रमाणे नागपुरातही आमची शिंदेसेनेशी युती होईल असे भाजपचे नेते, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, दोन पक्षांत जागावाटपाची चर्चा अद्याप सुरू झालेली नाही. शिंदेसेनेकडून राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आ. कृपाल तुमाने, किरण पांडव चर्चा करतील.
कुठे कुणाची चर्चा ?
अमरावती महापालिकेत भाजपचे निवडणूक प्रमुख माजी मंत्री डॉ. संजय कुटे, निवडणूक प्रमुख जयंत डेहनकर यांनी शिंदेसेनेचे नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्याशी प्राथमिक चर्चा केली आहे. अकोला पालिकेत भाजपचे आ. रणधीर सावरकर हे शिंदेसेनेच्या नेत्यांशी जागावाटपाची चर्चा करतील अशी शक्यता आहे.
स्थानिक भाजपचा विरोध
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात गेल्यावर्षी भाजपला धक्कादायक पराभव सहन करावा लागला होता. उद्धवसेनेच्या ज्या नगरसेवकांनी भाजपचा पराभवासाठी प्रयत्न केले त्यांना आता शिंदेसेनेत आणून युतीमध्ये तिकिटे देण्यास स्थानिक भाजपचा विरोध आहे. युतीच्या चर्चेत हा सर्वात मोठा अडसर असेल. तरीही तेच चेहरे शिंदेसेनेने दिले तर भाजप त्या ठिकाणी उमेदवार उतरविण्याची शक्यता आहे. तुम्हाला जागा सोडतो पण नवीन चेहरे द्या असा आग्रह भाजपकडून धरला जाऊ शकतो. शिंदेसेनेचे सहसंपर्कप्रमुख श्रीरंग पिंजरकर आदींशी आ. सावरकर लवकरच चर्चा करतील.
ठाण्यात सेनेशी युती नकोच! भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध
१. ठाणे : ठाण्यात महायुतीचा नारा देण्यात आला असला तरी भाजपच्या स्थानिक पदाधिकारी - कार्यकर्त्यांनी बुधवारी आमदार आणि शहराध्यक्षांची भेट घेऊन शिंदेसेनेशी युती करण्यास तीव्र विरोध दर्शवला. काहींनी पत्रे देऊन युतीला विरोध असल्याचे सांगितल्याने ठाण्यात भाजपमध्ये बंडखोरीचे वारे घोंघावू लागले अ आहे.
२. भाजप स्वबळावर लढल्यास आपल्याला संधी मिळेल, अशी अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. त्यादृष्टीने काहींनी प्रभागात मोर्चेबांधणीबी केली आहे. त्यासाठी खर्चही केला आहे. मात्र, आता निवडणुकीच्या तोंडावर अचानक युती केल्यास आपल्याला जागा सुटणार नाही, हे लक्षात आल्याने पदाधिकारी नाराज आहेत.
३. काम न करण्याचा इशारा? भाजपचे आ. संजय केळकर, आ. निरंजन डावखरे
यांच्यासह शहराध्यक्ष संदीप लेले यांच्या कार्यालयात जाऊन अनेक पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी पत्र दिले आणि आम्हाला युती नको, वरिष्ठांना कळवा, असा आग्रह धरल्याचे तसेच काही प्रभागांमध्ये काम न करण्याचा इशाराही दिला आहे.