Raosaheb Danve : "आधी स्वत:च्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवा अन् मग…"; रावसाहेब दानवेंचा जलीलांना खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 15:40 IST2022-08-06T15:30:45+5:302022-08-06T15:40:16+5:30
BJP Raosaheb Danve Slams Imtiyaz Jaleel : इम्तियाज जलील यांच्यावर भाजपाने आता जोरदार निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी जलील यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

Raosaheb Danve : "आधी स्वत:च्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवा अन् मग…"; रावसाहेब दानवेंचा जलीलांना खोचक टोला
शिवसेनेने भाजपला सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी स्थापन करत मुख्यमंत्री पद मिळवले. त्यानंतर राज्यात आलेल्या राजकीय भूकंपामुळे पद सोडण्याआधी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर केले. मात्र, शिवसेना बंडखोर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या साथीने मुख्यमंत्री पद मिळवताच नामांतराला स्थगिती दिली. पुन्हा ठराव घेत औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर केले. या निर्णयास एमआयएम, काँग्रेस आणि काही संघटनांनी जोरदार विरोध दर्शवला. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी नामांतराच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांच्यावर भाजपाने आता जोरदार निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते रावसाहेब दानवे (BJP Raosaheb Danve) यांनी जलील यांच्यावर बोचरी टीका केली आहे. आधी आपल्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवा, मग शहराला औरंगाबाद म्हणा, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे. "एमआयएमला माझा सवाल आहे की, तुम्हाला औरंगजेबबद्दल एवढं प्रेम का आहे? ज्यानं मराठवाड्यावर अन्याय केला, येथील लोकांना त्रास दिला, त्या औरंगजेबबद्दल तुम्हाला इतका पुळका येण्याचं कारण काय? सर्व महाराष्ट्र जाणतो, औरंगजेब काय होता? दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळेजण जाणतात."
"औरंगजेब नाव एवढं चांगलं असेल, तर तुम्ही आपल्या मुलाचं नाव औरंगजेब का ठेवत नाहीत?" असा सवालही रावसाहेब दानवे यांनी विचारला आहे. संपूर्ण संभाजीनगरमध्ये मुस्लीम समाजातील एकाही मुलाचं नाव औरंगजेब नाही, असं मला स्वत:ला माहीत आहे. आधी आपल्या मुलांची नावं औरंगजेब ठेवायला सुरुवात करा, मग आमच्या गावाला औरंगाबाद म्हणा" असंही दानवेंनी सांगितलं आहे.
ईडीच्या कारवाईबाबत देखील त्यांनी भाष्य केलं. "ईडीच्या कारवाया फक्त शिवसेनेवर झाल्या असं नाही, काँग्रेसच्या काळातही नेत्यांची चौकशी सुरू होती. आमच्या लोकांवर कारवाई झाली तेव्हा आम्ही कायद्याने लढलो. हे तोंडानं लढतात. तोंडामुळे हे वाया गेले. एखाद्या कुटुंबातील सदस्यांना नोटीस आली असेल पण कोर्टात सिद्ध करता येतं आम्ही गुन्हा केला नाही म्हणून. ईडीची कारवाई कायद्याने झाली आहे, यामागे राजकारण नाही" असंही रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.