"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 13:08 IST2025-07-27T13:08:24+5:302025-07-27T13:08:43+5:30
Narendra Modi : भाजपा नेते राज पुरोहित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भरभरून कौतुक केलं आहे.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
भाजपा नेते राज पुरोहित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भरभरून कौतुक केलं आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार आहेत. डोनाल्ड ट्रम्प त्यांना फोन करत आहेत. पण मोदी ट्रम्प यांचा फोन उचलत नाहीत" असा दावाही केला आहे. उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर खासदार म्हणून निवड करण्यात आली. याच निमित्ताने दादरमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राज पुरोहित यांनी हे मोठं विधान केलं आहे.
"आपण अमेरिकेला जाऊन आलो की, दोन दिवस जेटलॅक लागतो. त्यानंतर आपल्याला विश्रांती घ्यावी लागते. मात्र नरेंद्र मोदी फिनलँड, इंग्लंड दौरा करून अहमदाबादमध्ये दोन दिवसांत २२ उद्घाटनं करतात. मोदी हे कधीही न थकणारे, न थांबणारे पंतप्रधान आहेत. यामुळे माझा आत्मा म्हणतो की ते विष्णूचे अकरावे अवतार आहेत" असं पुरोहित यांनी म्हटलं आहे.
"मोदी ट्रम्प यांचा फोन उचलत नाहीत"
भाजपा नेत्याच्या या विधानाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. एवढंच नाही तर "अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मोदींना गेल्या तीन महिन्यांपासून रोज फोन करत आहेत. पण मोदी ट्रम्प यांचा फोन उचलत नाहीत" असं देखील राज पुरोहित यांनी म्हटलं आहे. २०१४, २०१९ आणि २०२४च्या लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतलेले नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा ‘जगातील सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यां’मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.
नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन!
‘मॉर्निंग कन्सल्ट’ या अमेरिकेतील नामांकित संशोधन संस्थेने या संदर्भातील सर्वेक्षण केले असून, त्यात तब्बल ७५ टक्के लोकांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर मोहोर उमटवली; तर १८ टक्के लोकांनी नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीला विरोध केला आणि सात टक्के लोकांनी कोणतेही मत व्यक्त केले नाही.पंतप्रधान मोदींनंतर दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे म्युंग आणि अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेव्हिअर मिलेई अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत.