Maharashtra Politics: “मविआमध्ये भविष्य सांगणारे बरेच झालेत, त्या यादीत शरद पवार सामील झाले हे दुर्दैव”
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 13:51 IST2023-03-05T13:50:26+5:302023-03-05T13:51:46+5:30
Maharashtra News: रस्त्यावर पोपट घेऊन भविष्य सांगणाऱ्यांची उपासमार का करताय, या शब्दांत महाविकास आघाडीवर पलटवार करण्यात आला.

Maharashtra Politics: “मविआमध्ये भविष्य सांगणारे बरेच झालेत, त्या यादीत शरद पवार सामील झाले हे दुर्दैव”
Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात आताच्या घडीला अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, अनेक मुद्द्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. यातच कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली. यावर भाजपने पलटवार केला आहे.
देशात बदलाचे वातावरण तयार होताना दिसत आहे. जवळपास सगळीकडे भाजपला एखादी जागा सोडली तर एकसुद्धा जागा मिळू शकली नाही. पुण्याच्या निवडणुकीबाबत काही सांगण्याची गरज नाही, ते जगजाहीर आहे. त्यामुळे आता निष्कर्ष काढणे योग्य नाही मला जी माहिती मिळाली आहे त्याच्यामध्ये देशाचे चित्र बदलत आहे. देशात आता बदलाचा सूर दिसत आहे, असे शरद पवार म्हणाले होते. मीडियाशी बोलताना भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर विखे-पाटील यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिले.
मविआतील नेते स्वप्नरंजनात रमलेत, शरद पवारांनी त्या यादीत जाऊन बसणे दुर्दैवी
शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडीतील अनेक नेते स्वप्नरंजनात रमलेले आहेत. महाविकास आघाडीत भविष्यकारांची संख्या जास्त होत चालली आहे. रस्त्यावर पोपट घेऊन पूर्वी भविष्य सांगितले जायचे. त्यामुळे रस्त्यावर पोपट घेऊन भविष्य सांगणाऱ्यांची उपासमार का करताय, अशी खोचक टीका राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. तसेच सन २०२४ मध्ये भाजप आणि शिंदे गटाविरोधात जनमत जाईल, असा दावा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला होता. यावरही राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रतिक्रिया देताना निशाणा साधला.
नाशिकमधील पराभवाची जबाबदारी महाविकास आघाडीने स्वीकारावी
नाशिक येथील पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला. याची जबाबदारी महाविकास आघाडीने आधी स्वीकारावी. ते महत्त्वाचे आहे. त्याबद्दल तुम्ही का बोलत नाही, अशी विचारणा करत, आता प्रत्येक जण आपल्या सोयीप्रमाणे अर्थ काढत आहे. कसबा येथील निकालाचा संदर्भ देऊन आता परिस्थिती बदलली आहे, असे प्रत्येकाला वाटू लागले आहे. त्यामुळे म्हटल्याप्रमाणे स्वप्नरंजन सुरू आहे. हे स्वप्नरंजन आम्ही थांबवू शकत नाही, असा पलटवार विखे-पाटील यांनी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"