CM Devendra Fadnavis News: विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडीसह विरोधक सत्ताधारी महायुती सरकारवर टीका करताना पाहायला मिळत आहे. तर, महायुती सरकार विरोधकांना जशास तसे उत्तर देताना दिसत आहे. यातच लुटारू आणि दरोडेखोर चड्डी बनियान गँग महाराष्ट्रात फिरत आहे, असा दावा करत विधान भवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार आंदोलन केले. यातच भाजपाच्या आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षावर केल्याचे पाहायला मिळाले.
विधान परिषदेच्या सभागृहाचे कामकाज सुरू होते. यातच आमदार परिणय फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करताना महादेव, श्रीराम, श्रीकृष्ण, चंद्र, सूर्य यांच्या उपमा दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रभू श्रीराम यांच्यासारखे चारित्र्यवान, श्रीकृष्णासारखी चातुर्य बुद्धी, देवाधिदेव महादेवासारखी सहनशक्ती तसेच विष पचवण्याची क्षमता असलेले, सूर्यासारखे तेज आणि चंद्रासारखे शीतल आहेत, असे परिणय फुके यांनी म्हटले आहे. तसेच परिणय फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कार्यशैली आणि नेतृत्वावर भाष्य करत त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील यश आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी योगदान याचाही उल्लेख केला. परिणय फुके यांनी केलेला कौतुकाचा वर्षाव राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरल्याचे म्हटले जात आहे.
विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंना ऑफर
विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना महायुतीमध्ये येण्यासाठी थेट ऑफर दिली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धवजी, सध्याची परिस्थिती पाहता आम्हाला २०२९ पर्यंत तिकडे येण्याची संधी नाही. मात्र तुम्हाला इकडे येण्याची संधी आहे. त्याचा विचार करता येईल. त्याचा आपण वेगळ्या पद्धतीने करू, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभानंतर उद्धव ठाकरे पत्रकारांशी बोलत होते. यावेळेस उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या ऑफरवर प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, हा प्रश्न नुसता बाकाचा नाही तर प्रसंग बडा बाका आहे. सभागृहात काही गोष्टी खेळीमेळीने होत असतात. त्या खेळीमेळीने घ्यायला हव्यात.