Nilesh Rane : "ठाकरे कुटुंब पैसे देऊन गर्दी गोळा करतं"; निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 13:15 IST2022-07-28T13:05:46+5:302022-07-28T13:15:21+5:30
BJP Nilesh Rane Slams Shivsena Uddhav Thackeray : भाजपाचे नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

Nilesh Rane : "ठाकरे कुटुंब पैसे देऊन गर्दी गोळा करतं"; निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
मुंबई - शिवसेनेत झालेलं अभूतपूर्व बंड, त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची ओढवलेली नामुष्की, पक्षाच्या अस्तित्वावर आलेलं संकट या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून एक प्रदीर्घ मुलाखत देत सर्व प्रश्नांची उत्तरं देत बंडखोर एकनाथ शिंदे आणि भाजपावर टीकास्त्र सोडले होते. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या मुलाखतीनंतर शिवसेनेतील बंडखोर गट आणि भाजपाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाजपाचे नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
"ठाकरे कुटुंब पैसे देऊन गर्दी गोळा करतं" असा गंभीर आरोप निलेश राणे (BJP Nilesh N Rane) यांनी केला आहे. तसेच "उद्धव ठाकरेंनी (Shivsena Uddhav Thackeray) फुटलेला पेपर सोडवला. धनुष्यबाण हे चिन्ह आता उद्धव ठाकरेंना न शोभणारं आहे. गेलेल्या लोकांना गद्दार म्हणून तुम्ही योद्धा होत नाही" असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच राणेंनी संजय राऊतांवर बोचरी टीका केली आहे. "संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलंय" असं म्हटलं आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपाने शिवसेनेला खोचक टोला लगावला. "उजेडात बाळासाहेबांची गरज नव्हती, नेहमी अंधारात बाळासाहेब आठवतात" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचे दोन फोटो ट्वीट करत जोरदार निशाणा साधला होता. उद्धव ठाकरे यांची संजय राऊतांनीच घेतलेली आधीची मुलाखत आणि आताची मुलाखत असे दोन फोटो राणे यांनी ट्वीट केले.
सत्ता होती तेव्हाची मुलाखत आणि सत्ता गेल्यानंतरची मुलाखत असं म्हणत त्यांनी ते दोन फोटो शेअर केले. निलेश राणेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं असून "उजेडात बाळासाहेबांची गरज नव्हती, नेहमी अंधारात बाळासाहेब आठवतात" असं म्हटलं होतं. याआधी देखील त्यांनी अनेकदा उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.