Maharashtra Floods: महाराष्ट्रात सध्या अतिवृष्टीने धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रातील बहुतांश भागात अतिवृष्टीने नुकसान केले आहे. कित्येक ठिकाणी जमीन पूर्णपणे खरवडून वाहून गेलेली आहे. मे महिन्याच्या मध्यात जो पाऊस सुरू झाला आहे, त्याने जवळजवळ उघडीप घेतलीच नाही. त्यामुळे, शेतीचे अतोनात नुकसान झाले आणि ग्रामीण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत भाजपाच्या आमदार आणि खासदारांनी महत्त्वाचा निर्णय घेत एका महिन्याचे संपूर्ण वेतन शेतकऱ्यांना मदत म्हणून देणार असल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केली.
"महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पूरस्थिती ओढावल्यामुळे संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांच्या पाठीशी भाजपा-महायुती सरकार आणि भारतीय जनता पार्टी खंबीरपणे उभे आहे. शासनाच्या वतीने पूरग्रस्तांचे मदत व पुनर्वसन कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. भाजपा कार्यकर्ते देखील प्रशासनाला सहकार्य करत आहेत. या कामाला आणखी गती देण्याच्या उद्देशाने राज्यातील सर्व भाजपा खासदार व आमदार एकजुटीने पुढे सरसावले आहेत. यासाठी खासदार व आमदारांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला आहे. यामुळे पूरग्रस्तांना दिलासा मिळेल, अशी आशा! पूरग्रस्तांचे जीवन लवकरात लवकर सुरळीत व्हावे, हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना!" असे रविंद्र चव्हाण यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये लिहिले.
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. राज्य सरकारने आतापर्यंत ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना २ हजार २१५ कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे. यापैकी १ हजार ८२९ कोटी रुपये जिल्हास्तरावर वितरित करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री, पालकमंत्री पूरग्रस्त भागाला भेटी देत आहेत. ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विरोधक करत आहेत. राज ठाकरे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुले पत्र लिहिले आहे. त्यांनी सरकारला पाच सूचना केल्या असून यावर विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.