ठाकरेंची संपत्ती काढणाऱ्या निशिकांत दुबेंचा मुंबईत कोट्यवधींचा फ्लॅट; कुठे-कधी घेतली प्रॉपर्टी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 20:13 IST2025-07-10T20:13:27+5:302025-07-10T20:13:49+5:30

BJP MP Nishikant Dubey Property In Mumbai: गेल्या काही दिवसांपासून भाजपा खासदार निशिकांत दुबे हे ठाकरे बंधूंवर टीका करत आहेत.

bjp mp nishikant dubey has a flat worth crores in mumbai know where and when did he buy the property | ठाकरेंची संपत्ती काढणाऱ्या निशिकांत दुबेंचा मुंबईत कोट्यवधींचा फ्लॅट; कुठे-कधी घेतली प्रॉपर्टी?

ठाकरेंची संपत्ती काढणाऱ्या निशिकांत दुबेंचा मुंबईत कोट्यवधींचा फ्लॅट; कुठे-कधी घेतली प्रॉपर्टी?

BJP MP Nishikant Dubey Property In Mumbai: गेल्या काही दिवसांपासून भाजपा खासदार निशिकांत दुबे सातत्याने ठाकरे बंधूंवर टीका करताना पाहायला मिळत आहेत. अलीकडेच निशिकांत दुबे यांनी एक्सवर पोस्ट करत ठाकरेंच्या संपत्तीबाबत दावे केले होते. परंतु, याच भाजपा खासदार निशिकांत दुबे यांची मुंबईत कोट्यवधींची प्रॉपर्टी असल्याची बाब समोर आली आहे. 

शालेय शिक्षणात पहिलीपासून  हिंदी भाषेच्या सक्तीवरून महाराष्ट्रात वाद पेटला असतानाच भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी मराठीवरून आक्रमक झालेले ठाकरे बंधू आणि मराठी माणसांना महाराष्ट्राबाहेर आल्यास आपटून मारण्याचा इशारा दिला होता. त्यावरून राज्यात संतापाची लाट उसळली होती. भाजपा नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या प्रकरणी स्पष्टीकरण द्यावे लागले होते. परंतु, यानंतरही निशिकांत दुबे यांची विधान सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच निशिकांत दुबे यांच्या मालमत्तेबाबत काही माहिती मिळाली आहे.

ठाकरेंची संपत्ती काढणाऱ्या निशिकांत दुबेंचा मुंबईत कोट्यवधींचा फ्लॅट 

भाजपाच्या मुंबई आणि महाराष्ट्राविरोधात बोलणाऱ्या खासदार निशिकांत दुबेंचा खारमध्ये कोट्यवधींचा फ्लॅट आहे. तो फ्लॅट त्याने भाडे तत्त्वावर दिला आहे. मुंबईत मराठी माणसाला राहायला घर नाही आणि बाहेरची माणसे इथे येऊन मालमत्ता घेत आहेत, असे ठाकरे गटाचे विधान परिषदेतील आमदार सचिन अहिर यांनी म्हटले आहे. विधान परिषदेत एका प्रश्नावर बोलत असताना सचिन अहिर यांनी याबाबत भाष्य केले. निशिकांत दुबे यांचा खारमध्ये १६०० स्क्वेअर फुटांपेक्षा मोठा फ्लॅट आहे. या आलिशान फ्लॅटची आत्ताची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. या घराचे भाडेही त्यांना मिळते आहे, असेही ते म्हणाले.

भाषेच्या आधारावर ठाकरे मारहाण करत असतील तर सहन करणार नाही

महाराष्ट्राचे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्येही महाराष्ट्राचे महत्त्वाचे योगदान आहे. मी इतर भाषांप्रमाणेच मराठीचाही सन्मान करतो. जसे मराठी माणसाचे मराठी भाषेवर प्रेम आहे, त्याचप्रकारे हिंदी भाषिकांचे हिंदी भाषेवर प्रेम आहे. त्यामुळे जर भाषेच्या आधारावर ठाकरे मारहाण करत असतील तर ते आम्ही सहन करणार नाही. तुम्ही गरिबांना मारता, पण मुंबईमध्ये मुकेश अंबानी राहतात. ते खूप कमी मराठी बोलतात. हिंमत असेल तर त्यांच्याजवळ जा. एवढेच नाही तर माहीममध्ये मोठ्या प्रमाणावर मुस्लिम राहतात, हिंमत असेल तर जरा तिकडेही जाऊन या, असे आव्हान निशिकांत दुबे यांनी दिले आहे.  

दरम्यान, निशिकांत दुबे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते यांच्या भ्रष्टाचाराची कहाण्या - न्यू मोर सांताक्रूझमध्ये 3BHK फ्लॅट, वांद्र्यात 4BHK, रचना, रामेश्वर, समृद्धी, नालासोपारा येथे फ्लॅट, एअर इंडिया कॉलनीत फ्लॅट, काजुपाडा आणि बोरिवली येथे व्यावसायिक दुकाने, कोकण रेस्टॉरंट नालासोपारा, कोकण केळवे येथील निवासी मालमत्ता...इतके पैसे कुठून आणता?, अशी पोस्ट दुबे यांनी केली आहे. तसेच जेव्हा राज ठाकरेंना जनतेचा पाठिंबा मिळत नाही, तेव्हा ते गुंडांना पुढे करतात. याचा अर्थ गुंडगिरी हा त्यांचा खरा हेतू आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पराभवाची भीती असल्यामुळेच ते हे सर्व करतात. निवडणुकीच्या अगदी आधी ते हिंसाचार किंवा आक्रमक राजकारण करू लागतात. मी ठाकरेंच्या गुंडगिरीच्या विरोधात आहे आणि आता सहनशीलतेच्या सर्व मर्यादा संपल्या आहेत, असेही निशिकांत दुबे यांनी एका पोस्टमध्ये म्हटले होते. 

 

Web Title: bjp mp nishikant dubey has a flat worth crores in mumbai know where and when did he buy the property

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.