BJP MP Narayan Rane News: गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यभरातील अनेक ठिकाणचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक उद्धवसेनेला जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गट, भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी ठाकरे गटाने केली असली, तरी पक्षाला लागत असलेली गळती सुरूच असल्याचे दिसत आहे. संजय राऊतांनी ठाकरे गटाची स्वबळाची भूमिका मांडल्यानंतर महाविकास आघाडीत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला. यातच आता भाजपा खासदार नारायण राणे यांनी ठाकरे गटावर खोचक शब्दांत टीकास्त्र सोडले.
मीडियाशी बोलताना नारायण राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे आधी दोन्ही हात वरती करून बोलत असायचे. मात्र आता ते हात एकदम छोटे झाले. त्यामुळे उद्या स्वबळावर लढून काय होणार? स्वबळाची ताकद त्यांची राहिली नाही. ४६ वर्षात बाळासाहेबांनी जे मिळवले ते अडीच वर्षात यांनी गमावले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती स्वबळावर लढणार का, याबाबत आता काही सांगू शकत नाही. ठाकरे गटाबाबत पक्षातील वरिष्ठ नेते निर्णय घेतील. तो जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असे नारायण राणे यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत यांची मानसिकता चांगली नाही
गेल्या अनेक दिवसांपासून बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणावरून तीव्र आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत, अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहे. यावरून संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. या टीकेबाबत नारायण राणे यांना प्रश्न विचारला असता, संजय राऊत यांची मानसिकता चांगली नाही. ते सध्या डिप्रेशनमध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे मी लक्ष देत नाही. तुम्हीही देऊ नका, अशी खोचक प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली.
दरम्यान, शिवसेनेची सत्ता असताना संजय राऊत कोणाकोणाला पोसत होते? कोणकोणत्या माफियांना संजय राऊत भेटत होते? कोणती तीर्थयात्रा केली म्हणून त्यांना जेलचा पुरस्कार मिळाला होता? हे त्यांना आधी सांगावे. शिवसेनेत बोलायला माणूस नसल्यामुळे त्यांना कामधंदा नसल्याने ते असे बोलतात, अशी टीका नारायण राणे यांनी केली.