हिंगोली - राज्यातील राजकारणात ५० खोके एकदम ओके ही विरोधकांची घोषणा प्रचंड गाजली. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंशी फारकत घेतल्यानंतर बहुतांश आमदार शिंदेंसोबत गेले. या आमदारांना प्रत्येकी ५० कोटी दिल्याचा आरोप ठाकरे गटाकडून वारंवार करण्यात आला. याला आता भाजपा आमदारानेच दुजोरा दिल्याचं दिसून येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपा आणि शिंदेसेना यांच्यात कुरघोडी सुरू आहे. त्यात भाजपा आमदार तानाजी मुटकुळे यांनी ५० खोकेची घटना हे सत्य असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे ५० खोके एकदम ओके हे पुन्हा चर्चेत आले आहे.
संतोष बांगर यांनी एकनाथ शिंदेंकडे जाण्यासाठी ५० कोटी घेतले असं विधान भाजपा आमदार तानाजी मुटकुळे यांनी केले होते. त्यावर पत्रकारांनी विचारले असता आमदार मुटकुळे म्हणाले की, मी केलेले विधान गंभीर असले तरी ते खरे आहे. मला इतरांचे माहिती नाही, परंतु संतोष बांगर यांना ५० कोटी मिळाले हे माहिती आहे. आदल्या दिवसापर्यंत ते रस्त्यावर उतरून लोकांना ठाकरेंसोबतच राहण्याचं सांगत होते, परंतु अचानक त्यांना स्वप्न पडलं आणि ते ५० कोटी घेऊन पळाले. एकनाथ शिंदेंच्या माणसाकडून ते पैसे बांगर यांना मिळाले असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.
हिंगोलीत शिंदेसेना-भाजपात संघर्ष
राज्यात सत्तेत असलेले भाजप आणि शिंदेसेना हिंगोली जिल्ह्यात नगरपालिकेच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. आतापर्यंत एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपांनी निवडणुकीत रंगत भरली होती. मात्र अलीकडेच शिंदेसेनेने भाजपाचे दोन उमेदवार फोडून भाजपाला धक्का दिला. हिंगोलीच्या नगराध्यक्षपदाच्या जागेवर भाजपचा दावा सांगितला जात असताना आमदार संतोष बांगर यांनी येथील निवडणुकीत उडी घेऊन शिंदेसेनेच्या वतीने नगराध्यक्षासह नगरसेवकपदासाठी उमेदवार उभे केले. त्यामुळे भाजप आणि शिंदेसेनेत सुरुवातीपासूनच वादाची ठिणगी पडली.
दरम्यान, या निवडणुकीच्या निमित्ताने शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर आणि भाजपा आमदार तानाजी मुटकुळे यांच्यात अनेक वेळा आरोप-प्रत्यारोप झाले. मित्रपक्षाच्या विरोधातच शड्डू ठोकला आहे. ही अशी परिस्थिती जवळपास सगळ्याच पालिकेत आहे. पालिकेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी चढाओढ सुरू आहे. त्यात तानाजी मुटकुळे यांच्या आरोपामुळे शिंदेसेनेवर विरोधकांनी केलेले आरोप सत्य निघाले अशी चर्चा लोकांमध्ये सुरू आहे.