चिखली : दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. याप्रकरणी धमकी देणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने २४ तासांत बुलढाण्यातून या दोघांना अटक केली आहे. दरम्यान, हे प्रकरण ताजे असताना बुलढाणा जिल्ह्यातून पुन्हा एक असेच धमकीचे पत्र समोर आले आहे.
बुलढाण्यातील चिखलीच्याभाजपाआमदार श्वेता महाले (Shweta Mahale) यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. श्वेता महाले यांच्या चिखली येथील निवासस्थानी हे धमकीचे पत्र मिळाले आहे. या धमकीच्या पत्राने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तसेच, आमदार श्वेता महाले या प्रकरणी चिखली पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती आहे.
या पत्रात श्वेता महाले यांच्याबद्दल अतिशय आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली आहे. दरम्यान, हे पत्र नेमकं कोणी आणि का पाठवलं, याचे कारण अद्याप कळू शकलेलं नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देण्याचे प्रकरण ताजे असताना बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
श्वेता महाले यांची आमदारकीची ही दुसरी टर्म आहे. जिल्हा परिषदेपासून त्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली आहे. आक्रमक आणि अभ्यासू स्वभावामुळे त्या अल्पावधीतच लोकप्रिय आमदार ठरल्या आहेत. स्त्रियांच्या प्रश्नांपासून ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांपर्यंत त्यांची ठाम मते आहेत. या प्रश्नांवर त्या नेहमीच आवाज उठवत असतात.