हिंगोली: औंढा नागनाथमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणावरून आता शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आमनेसामने आले आहेत. अहिल्यादेवींचा पुतळा गेल्या वर्षभरापासून अनावरणापासून वंचित आहे. या पुतळ्याच्या अनावरणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वेळ नाही. हा अहिल्यादेवींच्या स्मृतींचा अपमान असल्याची टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. तर पडळकर जातीचं राजकारण करत असल्याचा आरोप करत शिवसेनेनं त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.अॅडव्हाटेंज अजित पवार; निर्णय मोदी सरकारचा, पण फायदा ठाकरे सरकारलाअहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याच्या अनावरणास होत असलेल्या विलंबाबद्दल गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे. 'बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या हिंगोलीतल्या औंढा नागनाथ मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्यादेवी होळकर यांनी केला. त्यांच्याविषयी कृतज्ञतेचा भाव व्यक्त करत मंदिर समितीद्वारे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. पण हा पुतळा गेल्या वर्षभरापासून लोकार्पणापासून वंचित आहे. गेल्या वर्षभरापासून मुख्यमंत्र्यांना पुतळा अनावरणाला वेळ मिळत नसल्यानं आजही अहिल्यादेवींचा पुतळा प्लास्टिकमध्ये गुंडाळून दुर्लक्षितपणे उभा आहे. ही गोष्ट मनाला वेदना देणारी आहे,' असं पडळकर यांनी पत्रात लिहिलं आहे.
शिवसेनेचं पडळकर यांना प्रत्युत्तरमहान कर्तृत्ववान म्हणून ज्यांनी इतिहास गाजवला, त्या अहिल्यादेवी होळकर यांचा भव्य पुतळा उभारून जनभावनेचा आदर राखला आहे. या पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हावं, अशी सर्वांची इच्छा आहे. मध्यंतरी कोरोनामुळे ते शक्य झालं नाही. मात्र त्यातही पडळकर यांनी राजकारण करण्याचा प्रयत्न चालवला आहे. शिवसेनेने त्यांच्यासारखे जातीचे राजकारण कधीही केली नाही. त्यामुळे पडळकर यांनीच आपल्या वागण्याचा विचार करावा, अशी प्रतिक्रिया आमदार संतोष बांगर यांनी दिली.