पुरणपोळी अन् पत्रिका, त्यावर लिहिलं होतं साहेब...; पंकजा मुंडे आठवणीनं गहिवरल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 11:59 AM2024-03-11T11:59:49+5:302024-03-11T12:03:22+5:30

मी २००४ पासून राजकारणात काम करते. संघर्षातून राजकारण करतेय. पडल्यानंतर जास्त मोठी झाली.

BJP leader Pankaja Munde emotional in memory of Gopinath Munde | पुरणपोळी अन् पत्रिका, त्यावर लिहिलं होतं साहेब...; पंकजा मुंडे आठवणीनं गहिवरल्या

पुरणपोळी अन् पत्रिका, त्यावर लिहिलं होतं साहेब...; पंकजा मुंडे आठवणीनं गहिवरल्या

बीड - Pankaja Munde ( Marathi News ) गोपीनाथ गड हा पंकजा मुंडेंनी नव्हे तर तुम्ही केलाय. कारण त्या विचारांचे बीज माझ्या मेंदूत, हृदयात त्या पुरणपोळी आणि पत्रिकेने रोवलेला आहे म्हणून तो गड निर्माण केला. मी राजकारणात जिवंत राहणार का हे मला माहिती नव्हतं. मी या राज्यात गोपीनाथ मुंडेंच्या विचारांचे सरकार आणण्यासाठी सर्वात मोठे योगदान देईल हे मी सांगितलं होतं. त्यातून संघर्ष यात्रा काढली. त्याचवेळी गोपीनाथ गड निर्माण केला अशा आठवणी पंकजा मुंडे यांनी लोकांना सांगताना गहिवरल्या. 

बीडमधील एका कार्यक्रमात पंकजा मुंडे म्हणाल्या की, वटसावित्री पोर्णिमेचा तो दिवस होता, त्यादिवशी मी जिथे साहेबांच्या चितेला अग्नी दिला तिथे पाहिले तेव्हा कुणीतरी पुरणपोळी आणि एक पत्रिका ठेवली होती. त्यावर साहेब असा उल्लेख होता. मला हे पाहून गहिवरून आले. त्या माणसाने साहेबांच्या अग्नी दिला तिथे पत्रिका ठेवली. जर साहेबांना कुठे जागा नाही दिली तर ही लोक मरतील हा विचार माझ्या मनात आला. त्यामुळे मी गोपीनाथ गड उभारणार हा निश्चय केला असं त्यांनी म्हटलं. 

तसेच गोपीनाथ गड हा कुठला धार्मिक गड नाही, महंताचा गड नाही. कुठल्या संतांचा गड नाहीच नाही. तर एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या, सामान्य माणसासाठी लढणाऱ्या सामान्य माणसांचा तो गड आहे. तो गड ऊर्जेचा, प्रेरणेचा, आशेचा आहे. गोपीनाथ गड हा मी निर्माण केला नाही. तर तो तुम्ही केलाय. मुंडेसाहेब ३ जूनला गेले. १२ डिसेंबरला त्या गडाचे भूमिपूजन केले त्यानंतर पुढच्या ३ जूनला अमित शाहांच्या हस्ते त्या गडाचं भूमिपूजन केले. ६ महिन्यात गड उभा केला. याठिकाणी हजारो लोक कार्यक्रमाला येतात. सगळ्या विचारांचे सगळ्या पक्षांचे नेते तिथे आलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार हे नेते वगळता इतर सर्वच नेते आलेत असंही पंकजा मुंडेंनी सांगितले. 

दरम्यान, गोपीनाथ गड निर्माण करून तो लोकांना समर्पित केले, गडाच्या आधारे राजकारण करत नाही. गडावर हक्क सांगितला नाही. राजकारणातसुद्धा माणसाला परिपक्व बनावं लागते. मी २००४ पासून राजकारणात काम करते. संघर्षातून राजकारण करतेय. पडल्यानंतर जास्त मोठी झाली. मी पालकमंत्री असताना अनेकांना निधी दिला त्यामुळे माझी आठवणही आजही अनेकांना होतेय. ज्यांना कष्ट करता येतात, विचारांचे राजकारण होते. आता इतके दिवस वनवास भोगलाय, आता कलियुगात पाच वर्षच वनवास असावा. कुठेही गेले तरी माझ्यासोबत राहणार का? आपली स्वाभिमानाची लढाई कधीच सोडायची नाही. कलियुगाच्या राजकीय युद्धात माझ्या पाठिशी आशिवार्दाचे बळ उभं करा असं आवाहन पंकजा मुंडे यांनी जनतेला केले. 

Web Title: BJP leader Pankaja Munde emotional in memory of Gopinath Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.