राज्यावरील संकटं मुख्यमंत्र्यांचा पायगूण; पाय बघायला पाहिजे...; नारायण राणेंचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 20:25 IST2021-07-25T20:22:17+5:302021-07-25T20:25:11+5:30
केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज चिपळूण येथे जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. यानंतर राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

राज्यावरील संकटं मुख्यमंत्र्यांचा पायगूण; पाय बघायला पाहिजे...; नारायण राणेंचा हल्लाबोल
चिपळूण - राज्यावर सातत्याने येणाऱ्या संकटांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पायगूणच कारणीभूत आहे, आसा खोटच टोला भाजप नेते तथा केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी लगावला आहे. तसेच, ते मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यात वादळं काय, पाऊस काय, कारोना काय, सर्व सुरूच आहे. एवढेच नाही, तर कोरोना ही त्यांची देन आहे आपल्याला. मुख्यमंत्री आले कोरोना घेऊन आले. पाय पाहायला पाहिजे, पांढरे पाय आहेत का? अशा शब्दात नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला. ते चिपळूनमध्ये पत्रकारांशी बोलत होते. (BJP leader Narayan Rane slams cm Uddhav Thackeray over the Maharashtra Situation flood landslide and corona virus)
केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज चिपळूण येथे जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. यानंतर राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मुख्यमंत्री आले त्यांनी पाहणीही केली. ते त्यांच्या पद्धतीने आढावा घेतीलच. मात्र, आपणही पंतप्रधानांना रिपोर्ट देणार आहोत. येथील नागरिकांना कशा प्रकारे दिलासा देता येईल आणि पुन्हा आपल्या पायावर उभे करता येईल यावर विचार करू. हे सर्व लोक आमचे आहेत यांच्या डोळ्यात पाणी येणार नाही, याची काळजी घेऊ, असे आश्वासनही नारायण राणे यांनी यावेळी दिले.
चिपळूणमध्ये भयावह स्थिती -
चिपळूनची ही स्थिती भयावह आहे, असे म्हणत येथील व्यापाऱ्यांना अॅडव्हान्समध्ये विम्याचे पैसे मिळावेत, सरकारने त्यांना नुकसान भरपाई द्यावी आणि त्यांचे पुनर्वसन करावे, अशा मागण्याही राणे यांनी यावेळी केल्या आहेत.
अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही -
यावेळी केंद्रिय मंत्री नारायण राणे प्रशासकीय अधिकाऱ्यांवरही भडकले. मी आणि दोन्ही विरोधी पक्षनेते येथे आलो आहोत. मात्र, प्रशासन बेजबाबदार आहे. त्यांना नियम माहीत नाही. एकही अधिकारी आम्हाला भेटण्यासाठी आला नाही. अतिरिक्त जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी आणि इतर अधिकारीही कार्यालयात बसून होते. पण ते आले नाही. हा बेजबाबदारपणा आहे. यासंदर्भात आपण राज्याच्या मुख्यसचिवांकडे तसेच केंद्राकडे तक्रार करणार आहोत. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असेही राणे यावेळी म्हणाले.
uddhav thackeray : 'केंद्राकडूनही मदत मिळतेय, पंतप्रधान अन् गृहमंत्र्यांसोबत माझं बोलणं झालंय'
...मुख्यमंत्री काय पाहुणे आहेत का? -
चिपळूनमधील अधिकाऱ्यांसंदर्भात बोलताना राणे म्हणाले, लोक रडत आहेत, घरातील सामान फेकून देत आहेत आणि अधिकारी दात काढत आहेत. ते मुख्यमंत्र्यांना सोडण्यासाठी गेले. ते काय पाहुणे आहेत काय? असा सवाल करत, येऊन पाहणे त्यांचे कामच आहे, असे राणे म्हणाले. एवढेच नाही, तर पुढच्यावेळी मी न सांगता येणार. तेव्हा पाहू तुमच्या खुर्च्या राहतात का? असा थेट इशाराही त्यांनी येथील अधिकाऱ्यांना दिला आहे.