खडसेंवर अन्याय झाला का?; चंद्रकांत पाटलांनी सांगितली गाय-बकरीची गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 20:18 IST2020-05-13T20:14:36+5:302020-05-13T20:18:21+5:30
एकनाथ खडसेंच्या आरोपांना चंद्रकांत पाटलांकडून प्रत्युत्तर

खडसेंवर अन्याय झाला का?; चंद्रकांत पाटलांनी सांगितली गाय-बकरीची गोष्ट
मुंबई: विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्यानं नाराज झालेल्या एकनाथ खडसेंनीभाजपावर गंभीर आरोप केले. बाहेरुन आलेल्यांना उमेदवारी मिळते. मात्र पक्षाशी एकनिष्ठ असलेल्यांवर अन्याय होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आपल्या पाठीत खंजीर खुपसला गेल्याचं खडसे म्हणाले. खडसेंनी केलेल्या गंभीर आरोपांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं.
खडसे वारंवार पक्षावर जाहीरपणे आरोप करत असल्यानं यावर भाष्य करणं गरजेचं असल्याचं पाटील म्हणाले. यावर भाष्य करताना पाटील यांनी गाय-बकरीची गोष्ट सांगितली. 'एक माणूस बाजारात गाय घेऊन जात असतो. त्यावेळी त्याला वाटेत एक जण भेटतो. तो त्याला बकरी घेऊन कुठे निघालास, असं विचारतो. ती बकरी नसून गाय असल्याचं तो माणूस सांगतो. पुढे रस्त्यात भेटलेले अनेकजण बकरी कुठे घेऊन चाललास, अशी विचारणा करतात आणि बाजारात जाईपर्यंत त्या माणसाला आपल्यासोबत खरंच बकरी आहे, असं वाटू लागतं,' अशी गोष्ट पाटील यांनी सांगितली. एकच गोष्ट वारंवार सांगितली की ती खरी वाटू लागते. त्यामुळेच या विषयावर भाष्य करत असल्याचं पाटील म्हणाले.
विधानपरिषदेची उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर खडसेंनी भाजपावर शरसंधान साधलं. निष्ठावंतांना तिकीटं नाकारली जातात आणि बाहेरुन आलेल्यांना उमेदवारी देण्यात येते, असा आरोप खडसेंनी केला. त्यावर खडसेंना आतापर्यंत खूप काही दिलं, असा विचार करून केंद्रीय नेतृत्त्वानं त्यांना तिकीट नाकारलं असावं, असं पाटील यांनी म्हटलं. आयुष्यभर खस्ता खाऊन इतरांना मोठं करण्याची आमची संस्कृती असल्याचं पाटील यांनी सांगितलं. वसंतराव भागवत यांना पक्षाकडून काहीच मिळालं नाही. मुंडे, महाजन त्यांना गुरू मानायचे. भागवत यांनी नेते घडवले, असं पाटील यांनी सांगितलं.
एकनाथ खडसेंवर टीका करताना चंद्रकांत पाटील यांनी खडसे कुटुंबाला मिळालेल्या सगळ्या पदांची यादीच वाचून दाखवली. 'खडसे सातवेळा आमदार झाले. दोनवेळा त्यांना मंत्रिपद मिळालं. त्यांच्या सुनेला दोनदा खासदारकी मिळाली. मुलीला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळालं. खडसे यांच्या पत्नीला महानंदाचं अध्यक्षपद देण्यात आलं,' असं पाटील यांनी सांगितलं.
पाठीत खंजीर खुपसल्याची भावना खडसेंनी व्यक्त केली होती. त्यावरुनही पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. 'भाजपाच्या केंद्रीय संसदीय मंडळानं हरिभाऊ जावळे यांना लोकसभा निवडणुकीचं तिकीट जाहीर केलं होतं. मात्र ते तिकीट कापून खडसेंच्या सुनेला उमेदवारी देण्यात आली. तेव्हा खडसेंनी जावळेंच्या पाठीत खंजीर खुपसला नाही का? जग्वानी यांना देण्यात आलेलं विधान परिषदेचं तिकीट कापून खडसेंनी मुलाला उमेदवारी दिली. तेव्हा तुम्ही जग्वानी यांच्या पाठीत खंजीर खुपसला नाही का?', असे प्रश्न पाटील यांनी विचारले.
...म्हणून गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेची तिकिट दिलं; भाजपाने सांगितलं 'राज'कारण
खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात जुंपली; दोघांनी मोठीच्या मोठी यादीच वाचली