Maharashtra Politics: “सगळे सोडून गेले की हे फोटोग्राफी करायला मोकळे…”; भाजपची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 12:57 IST2022-11-12T12:57:13+5:302022-11-12T12:57:57+5:30
Maharashtra News: शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर भाजपने उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली आहे.

Maharashtra Politics: “सगळे सोडून गेले की हे फोटोग्राफी करायला मोकळे…”; भाजपची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
Maharashtra Politics: एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून उद्धव ठाकरे यांना एकामागून एक धक्के बसताना दिसत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील अनेक नेते, पदाधिकारी कार्यकर्ते पक्षाला जय महाराष्ट्र करताना दिसत आहेत. यातच आता शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर शिंदे गटात सहभागी झाले आहेत. यामुळे शिंदे गटातील खासदारांची संख्या १३वर पोहोचली आहे. या घडामोडींवरून भाजपने उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपत घेतल्यानंतर शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात गेले आहेत. त्यानंतर, राज्यातील विविध जिल्ह्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. तर, गेल्या काही दिवसांपासून उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाचे खासदार गजानन कीर्तिकर हे शिंदे गटात सामील होण्याची चर्चा रंगली होती. अखेर किर्तीकर यांचा शिंदे गटात प्रवेश झाला. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी गळाभेट घेत त्यांचे पक्षात स्वागत केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेण्यासाठी गजानन किर्तीकर आले होते. त्यानंतर, मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी जाहीर प्रवेश केला. यानंतर भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
सगळे सोडून गेले की हे फोटोग्राफी करायला मोकळे…
अतुल भातखळकर यांनी गजानन कीर्तिकरांसह अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते शिवसेना सोडून जात असल्याच्या पार्श्वभूमीवर एका वाक्यात ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सगळे सोडून गेले की हे फोटोग्राफी करायला मोकळे…, असे खोचक ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे. दुसरीकडे, गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात गेले असले, तरी त्यांचे पुत्र अमोल कीर्तिकर अद्यापही ठाकरे गटात आहेत. आपण, वडिलांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनी त्यांचा निर्णय घेतला आहे. वडिलांचा हा निर्णय वैयक्तिक असल्याचे अमोल यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी नुकतीच अमोल कीर्तिकर यांची शिवसेना उपनेते पदावर नियुक्ती केली आहे. त्यामुळेच, ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचेच काम पाहणार आहेत.
दरम्यान, अलीकडेच जामीनावर तुरुंगातून सुटका होऊन बाहेर आलेल्या संजय राऊतांनी गजानन कीर्तिकरांच्या शिंदे गटातील प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे. गजानन आमचे ज्येष्ठ सहकारी होते. आता त्यांनी पक्ष सोडला आहे. ते पाचवेळा आमदार, दोनवेळा खासदार राहिले. त्यांचे पुत्र मात्र आमच्यासोबत राहिले आहेत. किर्तीकरांसारखे नेते जेव्हा पक्ष सोडून जातात तेव्हा लोकांच्या मनात एक वेगळी भावना निष्ठा यासाठी होते. ते गेल्यामुळे फार काही नुकसान झालेले नाही. उद्यापासून त्यांना लोक विसरतील, असंही संजय राऊत म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"