Jalyukta Shivar : "महाविकास आघाडीने जलयुक्त शिवारची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले"
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 13:23 IST2021-10-27T13:22:40+5:302021-10-27T13:23:11+5:30
Jalyukt Shivar : भाजपनं लगावला जोरदार टोला. या अभियानामुळे पीक पेरणी क्षेत्रात, उत्पन्नात आणि शेतकऱ्यांच्या राहणीमानाच्या दर्जात वाढ झाली, असा अहवाल महाविकास आघाडी सरकारच्या जलसंधारण विभागाने दिला आहे.

Jalyukta Shivar : "महाविकास आघाडीने जलयुक्त शिवारची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले"
जलयुक्त शिवार (Jalyukta Shivar) अभियानामुळे राज्यातील भूजल पातळी वाढली आहे. तसेच उपसा वाढला तरी अनेक गावांमध्ये भूजल पातळी स्थिर आहे. या अभियानामुळे पीक पेरणी क्षेत्रात, उत्पन्नात आणि शेतकऱ्यांच्या राहणीमानाच्या दर्जात वाढ झाली, असा अहवाल महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi Government) जलसंधारण विभागाने दिला आहे. दरम्यान, यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला. जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली.
"जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली. त्यावेळी या योजनेच्या कामात गुणवता नाही, सिंचन क्षमता वाढली नाही, पारदर्शकता नाही, असे आघाडीकडून आरोप करण्यात आले होते," असं शेलार म्हणाले. "मग चौकशी अंती आता तुमच्या जलसंधारण विभागाने काय उत्तर दिली? जलयुक्त शिवारमुळे संरक्षित सिंचनाची व्यवस्था झाली, नगदी पिकांमध्ये शेतकऱ्यांची कमाई वाढली, लागवडीचा क्षेत्रफळ वाढले, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली, यासाठी जी टेक्नॉलॉजी वापरली होती आणि फोटो जीओ मँपिंग केले गेले त्यात गुणवत्ता आणि पारदर्शकता ठेवली गेली, आणि याच्यामध्ये गावकऱ्यांची सहभागिता होती. मग या सगळ्या गोष्टी जलसंधारण विभाग चौकशीअंती बोलत असेल तर केवळ अहंकारापोटी आणि राजकीय द्वेषापोटी तुम्ही या जलयुक्त शिवारला बदनाम केलं हे सिद्ध होते," असंही त्यांनी नमूद केलं.
राजकीय द्वेषातून आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा अपमान केला, शेतकऱ्यांचे नुकसान केले, आता तुमचेच दात तुमच्या घशात गेले ना? असा सणसणीत टोला शेलार यांनी आघाडी सरकारला लगावला आहे.