निवडणुकीपर्यंत आंदोलन वाढवत न्यायचं, हा मनोज जरांगेंचा प्रयत्न होता; आशिष देशमुख यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 04:20 PM2024-02-27T16:20:48+5:302024-02-27T16:25:02+5:30

मनोज जरांगेंच्या एसआयटी चौकशीवर भाजपाचे नेते आशिष देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

BJP leader Ashish Deshmukh has reacted to the SIT investigation of Manoj Jarange. | निवडणुकीपर्यंत आंदोलन वाढवत न्यायचं, हा मनोज जरांगेंचा प्रयत्न होता; आशिष देशमुख यांचा दावा

निवडणुकीपर्यंत आंदोलन वाढवत न्यायचं, हा मनोज जरांगेंचा प्रयत्न होता; आशिष देशमुख यांचा दावा

महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून  सुरू झाले. अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या एसआयटी चौकशीच्या मागणीवरुन सभागृहात गोंधळ सुरू झाला आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मनोज जरांगे पाटील प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.

मनोज जरांगेंच्या एसआयटी चौकशीवर भाजपाचे नेते आशिष देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकार मराठा आरक्षण देण्यासाठी सकारात्मक असताना तरीही मनोज जरांगे पाटील यांनी सहा महिने आंदोलन सुरू ठेवलं. अधिवेशनातून मराठा आरक्षण दिला असतानाही स्वतःच्या राजकीय महत्त्वकांक्षासाठी मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलनाचा उपयोग करत आहेत, असा आरोप आशिष देशमुख यांनी केला. 

देवेंद्र फडणवीस यांच्यावर वाईट शब्दात त्यांनी उल्लेख केला. त्यांना शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे यांचे पाठबळ आहे, असा दावाही आशिष देशमुख यांनी केला. निवडणुकीपर्यंत आंदोलन वाढवत न्यायचं हा मनोज जरांगे यांचा प्रयत्न होता. एसआयटी चौकशीतून मनोज जरांगेंचे जे कोणी ऑपरेटर आहेत, ते समोर येईल, असंही आशिष देशमुख म्हणाले.

सगळ्यांची चौकशी होऊ द्या- मनोज जरांगे

एसआयटी चौकशीच्या आदेशावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सगळ्यांची चौकशी होऊ द्या. हे मला गुंतवण्यासाठी षडयंत्र रचत आहेत. आतापर्यंत त्यांना एवढा निष्ठावंत आंदोलक भेटला नाही, त्यामुळे हे षडयंत्र सुरू आहे. आमच्या आई-बहिणीच्या छाताडावर तुम्ही नाचले तेव्हा काही वाटलं नाही का?, मी नुसतं आई म्हटलं तर ते कसे लागले?, असा सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित केला आहे. मराठ्यांनो आई बहिणीचे रक्षण करा. जातीसाठी उभे रहा. मी मरायला घाबरत नाही. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देणारच, असं मनोज जरांगेनी सांगितले. फक्त मुलगा म्हणून सर्वजण माझ्या पाठीमागे उभे रहा. समाजासाठी मरण येणं यासाठी खूप भाग्य लागते. मराठ्यांसाठी मी मरायला तयार आहे. जाळपोळ करणारी व्यक्ती आपली नाही. शांततेत आंदोलन करणारे आपले आहेत, असं मनोज जरांगे म्हणाले. तसेच शरद पवार यांच्याशी कधी बोललो नाही. मी त्यांची मदत घेतली नाही. मी निष्ठा विकू शकत नाही. तुमच्या सत्तेसाठी मी मराठ्यांना का फसवू?, असं म्हणत मनोज जरांगेंनी सर्व आरोप फेटाळले आहेत. 

Web Title: BJP leader Ashish Deshmukh has reacted to the SIT investigation of Manoj Jarange.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.