एकही मुस्लीम कुटुंब नसलेल्या गावात १८१ बांगलादेशींना सरकारी योजनेचा लाभ; किरीट सोमय्यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 12:46 IST2025-03-07T12:30:51+5:302025-03-07T12:46:26+5:30
नाशिकमध्ये १८१ बांगलादेशींनी केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेतल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला.

एकही मुस्लीम कुटुंब नसलेल्या गावात १८१ बांगलादेशींना सरकारी योजनेचा लाभ; किरीट सोमय्यांचा दावा
Kirit Somaiya: देशभरात अवैधरित्या भारतात घुसलेल्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध कारवाई सुरु करण्यात आली आहे. अशातच भाजप नेते किरीट सोमय्या यांचा बांगलादेशीच्या शोधाचा मोर्चा आता मालेगावनंतर नाशिककडे वळाला आहे. नाशिकच्या कळवणमध्ये पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेमध्ये बांगलादेशी लाभार्थी असल्याचा संशय भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये १८१ बांगलादेशी असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या हे कळवण कृषी कार्यालय आणि पोलीस ठाण्याला भेट देणार आहेत. यावेळी नाशिकच्या पोलीस महानिरीक्षकांचीही ते भेट घेणार आहेत.
नाशिकच्या कळवळ येथे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये १८१ बोगस लाभार्थी बांगलादेशी असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला. किरीट सोमय्या यांनी एक्स पोस्ट करत याची माहिती दिली. आत्ता बांगलादेशी लाभार्थी? आज कळवण आणि नाशिक दौरा गाव भादवण, तालुका कळवण, जिल्हा नाशिक येथे "प्रधानमंत्री किसान सम्मान निधि" योजना मध्ये १८१ बोगस बांगलादेशी लाभार्थी, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं. यासह किरीट सोमय्या यांनी बोगस लाभार्थ्यांची यादीदेखील पोस्ट केली आहे.
"मौजे भादवण येथे १८१ बोगस लाभार्थी निर्दशनास आले असून ते सर्व मुस्लीम समाजाचे आहेत. भादवण गावात आजपर्यंत एकही मुस्लिम कुटुंब अस्तित्वात नाही. तसेच यादीतील १८१ लाभार्थ्यांचा भादवण गावाशी संबंध नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस लाभार्थी प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत. याची सखोल चौकशी करुन कठोर कारवाई करण्यात यावी," अशी मागणी किरीट सोमय्या यांनी पत्राद्वारे केली आहे.
आत्ता बांगलादेशी लाभार्थी!?
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) March 7, 2025
आज कळवण आणि नाशिक दौरा
गाव भादवण, तालुका कळवण, जिल्हा नाशिक येथे "प्रधानमंत्री किसान सम्मान निधि" योजना मध्ये 181 बोगस बांगलादेशी लाभार्थी
सकाळी 12 वाजता कळवण (नाशिक जिल्हा) आणि 4 वाजता नाशिक@Dev_Fadnavis@BJP4Maharashtrapic.twitter.com/X6mYPwaPRw
दरम्यान, अमरावतीत साडेचार हजार बांगलादेशींना बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्मदाखले दिल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला. अमरावतीत महापालिका क्षेत्रात ४ हजार ५०० बांगलादेशी, रोहिंग्यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रशासनाने जन्मदाखले दिल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी पोलीस उपायुक्त आणि पोलीस निरीक्षकांसोबत चर्चा देखील केली. यावेळी किरीट सोमय्या यांनी ४६८ पानांचे पुरावे पोलिसांना दिले.