मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मेहनतीला आलेले विषारी फळ म्हणजे भाजप, अशी घणाघाती टीका उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर पक्षाच्या दसरा मेळाव्यात गुरुवारी केली. मुस्लिम महिलांकडून राखी बांधून घेण्याची तर कधी ‘बटेंगे तो कटेंगे’ म्हणण्याची पंतप्रधान मोदी यांची आणि भाजपची भूमिका सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना मान्य आहे का, असा सवालही त्यांनी केला.
भरपावसात झालेल्या या सभेत उद्धव यांनी पाऊस अंगावर घेतच भाषण दिले. त्यांनी भाजपला सुनावले की, आमच्या हिंदुत्वावर शंका घेऊ नका. भाजप म्हणजे अमिबा आहे. ध्येय ना धोरण असा हा पक्ष मन मानेल तसा पसरत चालला आहे. कमळाबाईने स्वत:ची कमळे फुलवली; पण जनतेच्या आयुष्याचा चिखल झाला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
भाजप आता हिंदू-मुस्लीम करत आहे, परंतु सरसंघचालक मोहन भागवत हे मशिदी, मदरशात जातात, मुस्लिमांचा धार्मिक नेता त्यांना राष्ट्रपिता म्हणतो. भागवतांनी अशाप्रकारे हिंदुत्व सोडले, असे म्हणण्याची हिंमत भाजपमध्ये नाही. उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख उद्धवसेना
....तर राज्यभर आंदोलन करणार शेतकऱ्यांच्या घरादाराचा चिखल झाला आहे. देवेंद्र फडणवीस हे आमचे राज्य होते तेव्हा म्हणत होते, ‘ओला दुष्काळ जाहीर करा.’ आता म्हणतात, ‘अशी संज्ञाच नाही.’ तुमची संज्ञा खड्ड्यात घाला, पण जनतेला मदत करा. सगळे निकष बाजूला ठेवा, हेक्टरी ५० हजार मदत करा. कर्जमुक्ती करा. अन्यथा राज्यभरात आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू. बिहारमध्ये निवडणूक आहे म्हणून तिथे महिलांना १०-१० हजार रुपये दिले, महाराष्ट्रासाठी पैसा का नाही, असा सवाल ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना केला.
राजसोबतच राहण्याची ग्वाहीतुम्ही आणि राज ठाकरे एकत्र येणार का? अशी विचारणा सभेतील गर्दीतून झाली. त्यावर उद्धव म्हणाले, मी आणि राज एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठीच. मातृभाषेचा घात होत असेल तिथे मराठी माणसात फूट पडू देणार नाही. हिंदीला विरोध नाही; पण सक्ती करायची नाही. मुंबईला व्यापाऱ्यांच्या खिशात टाकू देणार नाही.
Web Summary : Uddhav Thackeray slammed BJP as a poisonous outcome of RSS efforts. He questioned Modi's stances and Bhagwat's silence. Thackeray vowed statewide protests for farmer aid and affirmed unity with Raj Thackeray for Marathi cause.
Web Summary : उद्धव ठाकरे ने भाजपा को आरएसएस के प्रयासों का विषैला फल बताया। उन्होंने मोदी के रुख और भागवत की चुप्पी पर सवाल उठाए। ठाकरे ने किसानों की सहायता के लिए राज्यव्यापी विरोध का संकल्प लिया और मराठी कारण के लिए राज ठाकरे के साथ एकता की पुष्टि की।